लातूर शहरात महापालिकेच्या नोटीसीची चर्चा
प्रतिनिधी / लातूर
गेल्या काही दिवसांपासून लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी बिनापरवाना बांधकाम केलेल्या तर काहींनी केलेल्या नियमबाह्य बांधकामावर व अतीक्रमणावर बुलडोझर फिरविल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लातूर शहरातील जवळपास सर्वच मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, व्यवसायिक यांना वसुलीच्या नोटीसा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गुंठेवारी शुल्काची वसुली करण्याचा आदेश दिल्याने अडचणीत अधिक भर पडली आहे. तसेच लातूर शहरातील अनेक प्रतिष्ठीत डॉक्टराच्या हॉस्पिटलचा लाखो रूपयांच्या नोटीसा गेल्याने त्याचीही सर्वत्र चर्चा होत आहे. सर्वसामान्य नागरीकांतून कोरोनाच्या काळात आव्वाच्या सव्वा बिले दिल्याने डॉक्टरांना देवाघरची काठी बसल्याची चर्चा सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.
लातूर महापालिकेवर सर्वाधिक काळापासून काँग्रेसची सत्ता असल्याने नियमबाह्य व विनापरवाना बांधकामेही काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या आशिर्वादानेच झाली असल्याचे बोलले जाते. अनेकांनी बांधकाम परवाना न घेता बांधकामे केल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी दिलेल्या नोटीसीने अनेकांची अडचण झालेली आहे. आधीच कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतांना महापालिकेच्या नोटीसीने अनेकजण हैराण झाले आहेत.
अनेक बांधकाम व्यवसायिकांनी आपल्या मर्जीने व महापालिकेतील कांही अधिकार्यांच्या आशिर्वादाने बांधलेली बांधकामे ही नियमबाह्य असल्याचे दिसून आल्याने फरकाची रक्कम भरा असा आदेश आयुक्त अमन मित्तल यांनी दिल्याने अनेक बांधकाम व्यवसायिक ज्यांनी आपल्याला बांधकाम करा अशी परवानगी व आशिर्वाद दिला अशांनी आता मात्र हातवर केले असल्याचे बोलले जाते. काही बांधकाम व्यवसायिकांनी आयुक्तांनी दिलेल्या फरकाची रक्कम भरून बांधकामे नियमीत केल्याचेही बोलले जाते. अनियमीतता व नियमबाह्य बांधकामाला काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांचा मोठा हात असल्याची चर्चा आहे. त्यात महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडे स्थायी समितीचे सभापती पद असल्याने सभापतींनी दिलेल्या गुंठेवारी वसुलीला काँग्रेस नगरसेवकांचा आक्षेप असल्याचे बोलले जाते. गुंठेवारीच्या वसुलीदरानुसार ही रक्कम कांही कोटीच्या घरात आहे.
पालकमंत्र्यांचे मात्र मौन
लातूर शहरातील नियमबाह्य व बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात मोठ्याप्रमाणात कार्यवाही सुरू असतांना अनेकांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना हस्ते, परहस्ते या कारवाईबाबत अभय मागीतल्याचे चर्चिले जात असले तरी पालकमंत्री अमित देशमुख मात्र या सर्व बाबींपासुन अलिप्त असल्याचे दिसून आले. अनेकांनी पालकमंत्री अमीत देशमुख यांच्या प्रतीक्षेची वाट पाहिली. काल मात्र पालकमंत्री अमीत देशमुख यांचे लातूरात आगमन झाले. कांहींनी पालकमंत्र्यांना होत असलेल्या कारवाईबाबतचा निरोप दिला असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांची भुमिका ही गुलदस्त्यातच आहे. लातूर शहरातील मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांना नोटीस दिल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री काय भुमिका घेतील याकडे सर्व लातूरकरांचे लक्ष लागले असून बोगस गुंठेवारीच्या फरकाच्या रक्कमेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.