काळय़ा ढगांना रुपेरी कड असावी तशी वाईट बातम्यांना घेरणारी चांगली बातमी आली की थोडा वेळ बरे वाटते. मराठीत कर्तबगार माणसांच्या आत्मविश्वासाचे वर्णन करणारी एक म्हण आहे. ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन.’ रोनाल्डो नावाच्या महान फुटबॉलपटूला ती म्हण ठाऊक असण्याचे कारण नाही. पण परवा त्याने समस्त जगाला आपल्या लाथेचा प्रताप दाखवला. त्यांच्या भाषेत ‘लाथ मारीन आणि पाणी पिईन’ अशी म्हण प्रचलित व्हायला हरकत नाही.
झाले ते असे. सध्या फुटबॉल सामने चालू आहेत. एका कार्यक्रमात रोनाल्डो बोलत असताना त्याने समोरच्या टेबलवरच्या शीतपेयाच्या बाटल्या बाजूला सारल्या आणि साधे पाणी प्राशन केले, इतकेच नव्हे तर इतरांना तोच सल्ला दिला. सोशल मीडियामुळे हा प्रकार जगभर व्हायरल झाला आणि शीतपेये बनवणाऱया त्या कंपनीच्या शेअर्सचे भाव कोसळले. प्रचंड आर्थिक नुकसान झाले. फार फार दिवसांपूर्वी गोपीचंद पुलेला या आपल्या खेळाडूने देखील शीत पेयांबाबत हीच भूमिका घेतली होती. तेव्हा त्याचेदेखील आपण कौतुक केले होते.
अशा रीतीने अनेक तत्त्वनि÷ माणसे आपल्याला उपदेश करीत असतात. स्वतःच्या वागण्याने आदर्श घालून देत असतात. पण तरी शीत पेये, धूम्रपान, मद्यपान किंवा फास्ट फूडसारख्या आरोग्यविघातक गोष्टींची खाली गेलेली लोकप्रियता पुन्हा उसळी मारून वर येते. याचे कारण माणसाला उताराकडे जायला, प्रवाहाबरोबर वाहत जायला आवडते, ते सोपेही असते. मोह टाळणे अवघड असते.
रोनाल्डो असो की गोपीचंद पुलेला हे लोक एकीकडे. आणि दुसरीकडे चांगल्या चांगल्या ऐतिहासिक नायकांच्या भूमिका रंगवणारे अभिनेते आपली लोकप्रियता विकतात किंवा पणाला लावतात. बिनदिक्कत ते सिगारेट्स, तंबाखू, गुटखा वगैरेची जाहिरात करतात. दारूची थेट जाहिरात न करता त्या नावाचा सोडा किंवा बाटलीबंद पाणी नाममात्र आणतात आणि त्याची जाहिरात करतात. विविध व्यसने करणारा पुरुष ही मॅन किंवा मर्द किंवा पुरुषोत्तम असतो अशी त्यांनी ग्राहकांची समजूत करून दिलेली असते. या सर्वांनी अशा जाहिराती बंद केल्या म्हणून लगेच सारा देश निर्व्यसनी होणार आहे अशातला भाग नाही. पण निदान तो व्यसनांचे उदात्तीकरण तरी करणार नाही. पण लक्षात कोण घेतो?