वृत्तसंस्था/ सिडनी
मार्नुस लाबुशानेच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर येथील सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱया कसोटीतील शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवशी न्यूझीलंडविरूद्ध यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 454 धावांचा डोंगर उभा केला. दिवसअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात बिनबाद 63 धावा जमविल्या.
ऑस्ट्रेलियाने 3 बाद 283 या धावसंख्येवरून शनिवारी तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. अधिक उष्ण तापमानामध्ये 25 वर्षीय लाबुशानेने दर्जेदार फलंदाजी केली. 130 या धवसंख्येवरून लाबुशानेने न्यूझीलंडच्या गोलंदाजीला चोख प्रत्युत्तर दिले. द्विशतकासाठी केवळ एका धावेची गरज असताना लाबुशानेवर अधिकच मानसिक दडपण जाणविले. द्विशतक पूर्ण करण्यासाठी त्याला 20 मिनिटांचा कालावधी लागला. त्याने आपले द्विशतक चौकार ठोकून झळकविले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पहिले द्विशतक आहे. द्विशतकानंतर तो अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. ऍसलने त्याला झेलबाद केले.
लाबुशानेने 516 मिनिटे खेळपट्टीवर राहून 363 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारांसह 215 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सलामीच्या वॉर्नरने 3 चौकारांसह 45, स्टीव्ह स्मिथने 4 चौकारांसह 63, वेडने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22, कर्णधार पेनीने 3 चौकारांसह 35, स्टार्कने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 22 धावा जमविल्या.
न्यूझीलंडतर्फे ग्रॅण्डहोम आणि वेग्नर यांनी प्रत्येकी 3, ऍसलने 2 तसेच हेन्री आणि सॉमरविलेने प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर न्यूझीलंडने दिवसअखेर 29 षटकांत बिनबाद 63 धावा जमविल्या. लेथम 2 चौकारांसह 26 तर ब्लंडेल 4 चौकारांसह 34 धावावर खेळत आहे. न्यूझीलंडचा संघ या मालिकेत आपला व्हाईटवॉश टाळण्यासाठी झगडत आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 150.1 षटकांत सर्वबाद 454 (लाबुशाने 215, स्मिथ 63, वॉर्नर 45, पेनी 35, वेड 22, स्टार्क 22, ग्रॅण्डहोम आणि वेग्नर प्रत्येकी 3 बळी, ऍसल 2 बळी, हेन्री आणि सॉमरविले प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड प. डाव 29 षटकांत बिनबाद 63 (लेथम खेळत आहे. 26, ब्लंडेल खेळत आहे. 34).