ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी : पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 5 बाद 274
ब्रिस्बेन / वृत्तसंस्था
मार्नस लाबुशानेच्या (9 चौकारांसह 108) शानदार शतकानंतरही भारतीय नवोदित गोलंदाजांच्या नियंत्रित, समयोचित माऱयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाला चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 274 धावांवर समाधान मानावे लागले. 3 कसोटी सामने, 10 चेंडू व 11 बळींचा जेमतेम एकत्रित अनुभव असलेल्या युवा भारतीय गोलंदाजांचा पहिल्या दिवसातील मारा अर्थातच लक्षवेधी ठरला. टी. नटराजनने पदार्पणात 63 धावात 2 बळी घेतले, हे दिवसभरातील खेळाचे ठळक वैशिष्टय़ ठरले.
दिवसभरात 87 षटकांचा खेळ झाल्यानंतर तामिळनाडूचे जलद गोलंदाज नटराजनने 20-2-63-2 तर वॉशिंग्टन सुंदरने 22-4-63-1 असे पृथक्करण नोंदवले. रविचंद्रन अश्विन व जसप्रित बुमराह या अव्वल गोलंदाजांच्या गैरहजेरीत फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर या युवा गोलंदाजांनी हा करिष्मा साकारला.
एकीकडे, उंचापुरा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने स्टीव्ह स्मिथचा (77 चेंडूत 36) मोठा अडसर दूर केला तर नटराजनने शतकवीर लाबुशाने (204 चेंडूत 108) व मॅथ्यू वेड (85 चेंडूत 47) यांना पूलच्या मोहात पाडत तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी टीम पेन (38) व कॅमेरुन ग्रीन (28) क्रीझवर होते. या उभयतांनी सहाव्या गडय़ासाठी 61 धावांची अभेद्य भागीदारी साकारली होती.
लाबुशानेची खेळी संपुष्टात
वास्तविक, लाबुशाने ज्या आक्रमकतेने फलंदाजी करत होता, ते पाहता ऑस्ट्रेलियाला दिवसअखेर 350 धावांच्या उंबरठय़ावर पोहोचणे फारसे कठीण नव्हते. पण, नटराजनच्या एका फसव्या चेंडूवर लाबुशानेचा अंदाज चुकला आणि पंतने झेल टिपत प्रदीर्घ खेळी संपुष्टात आणली. कसोटीत 300 वा भारतीय खेळाडू ठरलेल्या नटराजनने पहिल्या दोन स्पेलमध्ये फुललेंग्थ मारा केला आणि चेंडू जुना झाल्यानंतर त्याने आखूड टप्प्यावर भर देत वेड व लाबुशाने या दोघांनाही पूलचे फटके मारण्याच्या मोहात पाडले. या लढतीत गोलंदाजीची मुख्य धुरा सांभाळणाऱया सिराजने देखील 19 षटकात 51 धावात 1 बळी घेतला. शार्दुलच्या खात्यावर 67 धावात 1 बळी नोंदवला गेला.
लाबुशाने 37 धावांवर असताना गलीवर तैनात कर्णधार अजिंक्य रहाणेने सोपा झेल सोडला आणि संघाला याची मोठी किंमत मोजावी लागली. लाबुशानेने या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेतला. त्याने पहिल्या सत्रात 82 चेंडूंचा सामना करताना केवळ 19 धावा केल्या. मात्र, पुढील 113 चेंडूत त्याने 82 धावांची आतषबाजी केली आणि 195 चेंडूत वैयक्तिक पाचवे शतक साजरे केले.
बुमराह, अश्विन, जडेजा, हनुमा विहारीसारखे 4 मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर फेकले गेले असताना रहाणेने नाणेफेकीचा कौलही गमावला. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अर्थात, भारतीय गोलंदाजांचा फडशा पाडण्याचे त्यांचे इरादे मात्र तितके सफल होऊ शकले नाहीत. पहिल्या टप्प्यात वॉर्नर (1), हॅरिस (5) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतले होते.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः डेव्हिड वॉर्नर झे. शर्मा, गो. सिराज 1 (4 चेंडू), मार्कस हॅरिस झे. वॉशिंग्टन सुंदर, गो. ठाकुर 5 (23 चेंडू), मार्नस लाबुशाने झे. पंत, गो. नटराजन 108 (204 चेंडूत 9 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. शर्मा, गो. वॉशिंग्टन सुंदर 36 (77 चेंडूत 5 चौकार), मॅथ्यू वेड झे. ठाकुर, गो. नटराजन 45 (87 चेंडूत 6 चौकार), कॅमेरुन ग्रीन खेळत आहे 28 (70 चेंडूत 3 चौकार), टीम पेन खेळत आहे 38 (62 चेंडूत 5 चौकार). अवांतर 13. एकूण 87 षटकात 5 बाद 274.
गडी बाद होण्याचा क्रम
1-4 (वॉर्नर, 0.6), 2-17 (हॅरिस, 8.1), 3-87 (स्मिथ, 34.1), 4-200 (वेड, 63.4), 5-213 (लाबुशाने, 65.5).
गोलंदाजी
मोहम्मद सिराज 19-8-51-1, टी. नटराजन 20-2-63-2, शार्दुल ठाकुर 18-5-67-1, नवदीप सैनी 7.5-2-21-0, वॉशिंग्टन सुंदर 22-4-63-1, रोहित शर्मा 0.1-0-1-0.
तिन्ही क्रिकेट प्रकारात एकाच दौऱयात पदार्पणाचा विक्रम
नेट बॉलर या नात्याने ऑस्ट्रेलियात आलेल्या जलदगती गोलंदाज टी. नटराजन हा एकाच दौऱयात तिन्ही क्रिकेट प्रकारात आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला.
मूळ तामिळनाडूचा 29 वर्षीय नटराजन वास्तविक, येथे दुय्यम भूमिकेत दाखल झाला होता. पण, अव्वल गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने त्याला तिन्ही क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाची संधी मिळत गेली. त्याने दि. 2 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया लढतीत वनडे पदार्पण केले. तो सामना भारताने 13 धावांनी जिंकला. नटराजनने त्यात 10 षटकांचा कोटा पूर्ण करताना 70 धावात 2 बळी घेतले.
पुढे, भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला, त्यात नटराजनने देखील मोलाचा वाटा उचलला. या पदार्पणाच्या मालिकेत त्याच्या खात्यावर 6 टी-20 बळी नोंदवले गेले. त्यानंतर शुक्रवारी कसोटीतही पदार्पण करताना पहिल्या दिवसअखेर त्याने 20 षटकात 63 धावात 2 बळी घेतले.
पितृत्वाच्या रजेपासून ‘नट्टू’ कित्येक कोस दूरच!
तामिळनाडूतील सालेममध्ये पलयमपट्टी नावाचे खेडे असून टी. नटराजन हा येथील रहिवासी. पलयमपट्टी ते ब्रिस्बेनचे गुगल मॅपवरील अंतर 9035 किलोमीटर आहे. अर्थात, आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर टी. नटराजनने घरच्या मैदानावर खेळणाऱया ऑस्ट्रेलियन आघाडीवीरांची पळताभुई थोडी करण्यात कसर सोडली नाही. नटराजनची आई रोजंदारीवर मेहनत करते. त्याच्यावर कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात सदोष शैलीच्या आरोपांना सामोरे जावे लागले. पण, मेहनतीच्या बळावर अशा साऱया अडचणीवर मात करण्यात नट्टू अर्थात नटराजन यशस्वी ठरला. अर्थात, अद्याप तो या स्तरावरही पोहोचलेला नाही की विराट कोहलीप्रमाणे त्याचाही पितृत्वाच्या रजेसाठी विचार होईल. नटराजनची कन्या सध्याच 3 महिन्यांची झाली आहे.
नवदीप सैनीही दुखापतग्रस्त, भारताच्या चिंतेत आणखी भर
आघाडी फळीतील विविध खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतीय संघाला शुक्रवारी आणखी एक नवा धक्का बसला असून जलद गोलंदाज नवदीप सैनीला धोंडशिरेची दुखापत उद्भवली आहे. 28 वर्षीय सैनीला डावातील 36 वे षटक व वैयक्तिक 8 वे षटक टाकताना ही दुखापत झाली. वेदनेमुळे त्याला तातडीने मैदान सोडावे लागले व त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू उपकर्णधार रोहित शर्माने टाकत ते षटक पूर्ण केले. सैनीने या मालिकेत सिडनीत कसोटी पदार्पण केले. शिवाय, त्या सामन्यात 4 बळी घेतले होते.
स्टीव्ह स्मिथसाठी ‘सुंदर’ जाळे
स्मिथसमवेत फलंदाजी करत असताना लाबुशाने विशेष आक्रमक पवित्र्यात होता. पण, 2016 पर्यंत स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात असलेल्या आणि आता आघाडीच्या ऑफस्पिनर भूमिकेत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने लेग ट्रपमध्ये स्मिथला अलगद पकडले. स्मिथने ऑनसाईडकडे फटका मारण्याचा प्रयत्न केल्यास तजवीज म्हणून रोहित शॉर्ट मिडविकेटवर आला आणि उपाहारानंतर काहीच मिनिटात ही चलाखी फळाला आली. स्मिथने येथे फ्लिक करण्याच्या प्रयत्नात थेट रोहितच्या हातात सोपा झेल दिला.