पंतप्रधान मोदी यांनी केले अभिष्टचिंतन, अनेक नेते उपस्थित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे माजी गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 95 व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांचा 94 वा वाढदिवस येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अडवाणी यांना आवडणारा चॉकलेट केक कापून पंतप्रधान मोदींनी अडवाणींचे तोंड गोड केले.
या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी लालकृण अडवाणी यांच्या महान कार्याचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा भारताच्या राजकारणाचा रंग पालटणारी ठरली. या यात्रेमुळे भारतीय जनता पक्ष देशाच्या कानाकोपऱयात पोहचला. अयोध्येत आज भव्य राममंदिराचे निर्मितीकार्य होत आहे. या कार्याचा पाया जणू या रथयात्रेने घातला होता. अडवाणीही या आठवणींनी भावूक झाले होते. मात्र, त्यांनी शब्दांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
व्यंकय्या नायडूही उपस्थित
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूही उपस्थित होते. त्यांनी अडवाणींना वंदन करुन शुभेच्छा दिल्या. यानिमित्त उपस्थितांनी गतस्मृतींना उजाळा दिला. अडवाणी गुजरातच्या गांधीनगर मतदारासंघातून लोकसभेवर अनेकदा निवडून आले आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे नेतृत्व पेले होते. 2004 ते 2014 या कालावधीत ते लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. देशाचे गृहमंत्रीपद त्यांनी 1998 ते 2004 या काळात सांभाळले. त्यांच्याच गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांची निर्मिती झाली होती. त्यांनी आता वयाची 94 वर्षे पूर्ण केली आहेत.