ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यामुळे लालबाग राजा गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यंदा लालबाग राजा मंडळ आरोग्योत्सव साजरा करणार आहे. मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील लालबागचा राजा गणेश मंडळाचे कौतुक ट्विटरद्वारे केले आहे.
लालबागचा राजा गणेश मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साजरा न करता त्याऐवजी 12 दिवस प्लाझ्मा दान शिबीर घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल वार्षिक गणोशोत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो, असं ट्विट करत चिदंबरम यांनी निर्णयाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला 86 वर्षांची पंरपरा आहे. मागील 86 वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाच्या 14 फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.