रांची / वृत्तसंस्था
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली असून त्यांना आता रांचीतील ‘रिम्स’मधून दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात येणार आहे. एअर ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना दिल्लीला हलविले जाणार आहे. लालू यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झाले असून त्यांचे एक मूत्रपिंडही खराब झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी दिली.
तुरूंगवास भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यावर गुरुवारी रांचीतील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी लालूप्रसाद यांची भेट घेतली. पत्नी राबडीदेवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती यांनी इस्पितळात धाव घेत प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चाही केली होती. लालूंना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना विशेष परवानगी देण्यात आली होती. तब्बल पाच तास सर्वजण त्यांच्यासोबत होते. लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.