साठ लाख रुपयांचा दंडही, पाचव्या चारा घोटाळय़ात आणखी 37 जणांनाही शिक्षा
रांची / वृत्तसंस्था
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांना येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोरांदा चारा घोटाळा प्रकरणी 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचप्रमाणे त्यांना तब्बल 60 लाख रुपयांचा दंडही करण्यात आला. त्यांच्याशिवाय आणखी 37 जणांनाही शिक्षा करण्यात आली. गेल्या मंगळवारी त्यांना या प्रकरणात दोषी धरण्यात आले होते .
या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल, असे यादव यांच्या वकीलांनी स्पष्ट केले. दिलेल्या शिक्षेपैकी निम्म्याहून अधिक शिक्षा यादव यांनी यापूर्वीच भोगली आहे, असे त्यांच्या वकीलांचे म्हणणे आहे. यादव यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मध्यंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोरांदा चारा घोटाळा 139.50 कोटी रुपयांचा आहे. दुभत्या जनावरांसाठी बिहार सरकारने आरक्षित ठेवलेल्या निधीमधील पैशाचा अपहार करण्याचा आरोप लालू यादवांवर ठेवण्यात आला होता. आतापर्यंत त्यांना आणखी चार अशाच प्रकारच्या आरोपांमध्ये शिक्षा झाली आहे. दोरांदा घोटाळय़ात एकंदर 99 आरोप होते. त्यांपैकी 24 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया
चारा घोटाळय़ातील निर्णयावर मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. मात्र हा निर्णय म्हणजे शेवट नव्हे. अद्याप आमच्यासमोर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असे पर्याय आहेत. आही शेवटपर्यंत लढत राहू, अशी प्रतिक्रिया लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली आहे.
22 वर्षे चालले प्रकरण
दोरांदा चारा घोटाळय़ाचे हे प्रकरण न्यायालयात 22 वर्षे चालले. या कालावधीत 55 आरोपींचा मृत्यू झाला तर आठ आरोपी माफीचे साक्षीदार बनले. तर 6 आरोपी आजही फरारी आहेत. पहिल्या चार चारा घोटाळय़ात लालू यादव यांना शिक्षा होऊनही त्यांना जामीन देण्यात आला आहे. आता या पाचव्या घोटाळय़ातही ते जामीनासाठी प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. त्यांचे वय 73 वर्षांचे आहे.
राजदचे नेते संतप्त
देशात जणू काही चारा घोटाळय़ाशिवाय दुसरा घोटाळाच नाही अशी समजूत करुन देण्यात येत आहे. केवळ बिहारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये 80 घोटाळे घडले आहेत. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना सुखाने देशाबाहेर जाऊ देण्यात आले आहे. अशा घोटाळय़ांच्या वेळी सीबीआय कोठे असते, असा प्रश्न काही संतप्त राजद नेत्यांनी विचारला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष आहे. अखेरपर्यंत प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकंदर 19 वर्षांची शिक्षा
मागच्या चार चारा घोटाळय़ांमध्ये लालू प्रसाद यादव यांना एकंदर 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आता त्यात आणखी 5 वर्षांची भर पडली आहे. अशा प्रकारे पाच घोटाळय़ांमध्ये त्यांना एकंदर 19 वर्षांची शिक्षा झालेली असून कोटय़वधी रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.