वृत्तसंस्था/ हरारे
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी अखेर यजमान झिंबाब्वेविरुद्ध पाकने पहिल्या डावात 4 बाद 264 धावा जमवित 88 धावांची आघाडी मिळविली आहे. सलामीच्या इमरान बटचे शतक 9 धावांनी हुकले. अबीद अली आणि फवाद आलम यांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात झिंबाब्वेचा पहिला डाव 176 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर पाकने बिनबाद 2 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. इमरान बट आणि अबीद अली यांनी सलामीच्या गडय़ासाठी 115 धावांची शतकी भागीदारी केली. झिंबाब्वेच्या चिसोरोने अबीद अलीला झेलबाद केले. त्याने 140 चेंडूत 10 चौकारासह 60 धावा जमविल्या. इमरान बट आणि अझहर अली यांनी संघाची स्थिती सावरताना दुसऱया गडय़ासाठी 61 धावांची भर घातली. टिर्पेनोने अझहर अलीला झेलबाद केले. त्याने 70 चेंडूत 5 चौकारासह 36 धावा जमविल्या. कर्णधार बाबर आझमला आपले खाते उघडता आले नाही. टिर्पेनोने त्याला झेलबाद केले. इमरान बट चौथ्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. त्याने 236 चेंडूत 7 चौकारांसह 91 धावांचे योगदान दिले. फवाद आलम 8 चौकारासह 52 तर रिझवान 1 चौकारासह 14 धावावर खेळत आहे. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 38 धावांची भागीदारी केली आहे. झिंबाब्वेतर्फे टिर्पेनोने 2 तर निगेरेव्हा आणि चिसोरो यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला आहे.
संक्षिप्त धावफलक – झिंबाब्वे प. डाव सर्वबाद 176, पाक प. डाव 92.1 षटकात 4 बाद 264 (इमरान बट 91, अबीद अली 60, अझहर अली 36, बाबर आझम 0, फवाद आलम खेळत आहे 52, रिझवान खेळत आहे 14, टिर्पेनो 2-67, मिगेरेवा 1-52, चिसोरो 1-69).