ऑनलाईन टीम / रांची :
चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अचानक अस्थिर झाल्याने त्यांना गुरुवारी रिम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आज पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना डॉक्टरांनी रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमधून दिल्लीतील एम्समध्ये रेफर केले आहे.
गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेजस्वी यादव यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या छातीच्या संसर्गामुळे त्यांची तब्येत बिघडली. तसेच त्यांच्या चेहऱ्याला देखील सूज आली आहे. त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, लालू प्रसाद यांना किडनी आणि ह्रदयविकाराचा देखील त्रास आहे. त्याचप्रमाणे मधुमेह आणि उच्च रक्त दाबाचा त्रास देखील त्यांना आहे. लालू प्रसाद यादव यांच्या किडण्या केवळ 25 टक्के काम करत असल्याचे रिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.