ऑनलाईन टीम / रांची :
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. रांची मधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स) मध्ये त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासनाकडून सांगण्यात आले की, लालू यादव यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, त्यांच्या मदतीसाठी असलेल्या तीन सेवकांपैकी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याला रिम्स मधील आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. चारा घोटाळाप्रकरणी जेलमध्ये जेल मध्ये शिक्षा भोगत असलेले माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहाय्यकांचे शनिवारी नमुने घेण्यात आले होते. त्यात लालू यादव यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, लालू यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्यांना रिम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. त्यांना तिसऱ्या टप्प्यातील किडनी चा आजार आहे. लालू यादव यांच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी नियमित जामिनासाठी अर्ज देखील केला होता.