लाल किल्ला हिंसाप्रकरणी मोठा खुलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेप्रकरणी धार्मिक आणि शेतकरी संघटनेचा झेंडा फडकविणे एवढाच हेतू नव्हता, तर लाल किल्ल्याला कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शनांचे नवे केंद्र करण्याचा कट शिजला होता.
लाल किल्ल्यावरील हिंसेच्या कटाचा पूर्ण तपशील आरोपपत्रात नमूद आहे. पोलिसांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये डिसेंबर 2020 आणि डिसेंबर 2019 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या टॅक्टरांच्या आकडेवारीचा अभ्यास केला होता. डिसेंबर 2019 च्या तुलनेत मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंजाबमध्ये ट्रक्टरची खरेदी 95 टक्क्यांनी वाढली होती, असे तपासात आढळून आले. हिंसाचाराकरता आरोपींनी ट्रक्टरचा वापर केला होता.
लाल किल्ल्याला स्वतःच्या आंदोलनाचे नवे केंद्र करण्याचा उद्देश जमावाचा होता. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारची फजिती व्हावी म्हणून आरोपींनी जाणूनबुजून लाल किल्ल्यावर शेतकऱयांचा झेंडा फडकविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाची निवड केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हिंसेच्या कटाचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी ट्रक्टर अँड मॅकेनायजेशन असोसिएशनकडून पंजाब-हरियाणामध्ये दर महिन्याला होणाऱया ट्रक्टर्सच्या विक्रीची आकडेवारी मागितली होती. नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये पंजाबमध्ये ट्रक्टर्सची खरेदी 43.53 टक्के वाढली होती. अशाचप्रकारे जानेवारी 2020 च्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये ट्रक्टर्सच्या विक्रीत 85.13 टक्क्यांची वाढ झाली होती.
पैशांचेही आमिष हरियाणात नोव्हेंबर 2020 मध्ये ट्रक्टर्सची खरेदी 31.81 टक्के आणि डिसेंबरमध्ये 50.32 टक्के वाढली होती. जानेवारीमध्ये यात 48 टक्क्यांची वाढ झाली होती. हिंसेच्या कटाला मूर्त रुप देण्यासाठी पैशांचाही वापर झाला. आरोपी इक्बाल सिंगच्या चौकशीतून हा खुलासा झाला आहे. सिख फॉर जस्टिस ग्रूपने लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकविल्यास रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते, असे इक्बालने चौकशीत सांगितले आहे. इक्बाल सिंग 19 जानेवारी रोजी पंजाबच्या तरनतारण येथे गेला होता. लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकविणारे बहुतांश आरोपी तरनतारण येथीलच आहेत.