ऑनलाईन टीम / ठाणे :
ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर टॉमेटो घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
या ट्रकमध्ये 20 टन टॉमेटो होते. रस्त्याच्या मधोमध ट्रक पालटल्यानं संपूर्ण रस्त्यावर टॉमेटोचा खच पडून रस्ता टोमॅटोमय झाला होता. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले टॉमेटो बाजूला करण्यात आले. ट्रक आणि टॉमेटोचा खच पडल्याने मुंबई आणि नाशिक या मार्गावर चार ते पाच तास वाहतूक खोळंबली होती. दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील ट्रक व टॉमेटो बाजूला करण्यात आला. त्यानंतर सुमारे आठच्या सुमारास वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
त्यातच मुसळधार पावसामुळे वाहतूकदारांचे हाल झाले होते. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चालक कुठे ट्रक घेऊन जात होता याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.