वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आळा बसावा यासाठी अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. पण ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची असून परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा त्याचा पूर्वीप्रमाणे वापर करता येईल, असे प्रतिपादन आयसीसीच्या क्रिकेट समितीचे चेअरमन अनिल कुंबळे यांनी केले आहे.
क्रिकेटमध्ये चेंडूला लकाकी आणण्यासाठी गोलंदाज लाळेचा वापर करतात. पण सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार अधिक होत असून त्याचा वापर केल्याने कोरोनाचा प्रसार होण्यास अधिक मदत होण्याची शक्यता असल्याने सध्या लाळेच्या वापरावर हंगामी स्वरूपाची बंदी घालण्याची शिफारस केली आहे आणि आयसीसीनेही त्याला समर्थन दिले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली आल्यानंतर पुन्हा सर्व काही पूर्वपदावर येईल, असे कुंबळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या या पॅनेलने कोरोनाच्या संभाव्य संसर्ग होवू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून लाळेच्या वापरावर हंगामी स्वरूपाची बंदी घालण्याचे सुचविले हाते. शुक्रवारी आयसीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये क्रिकेटचा पुन्हा प्रारंभ करण्यासाठी काही नियमावलीची अंमलबजावणी करावी लागेल. चालू वर्षांतील शिल्लक असलेल्या काही महिन्यामध्ये क्रिकेट पुन्हा पूर्ववत सुरू होतील आणि कोरोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली येईल, अशी आशा कुंबळे यांनी स्टार स्पोर्टस् क्रिकेट शोमध्ये व्यक्त केली. लाळेच्या वापरावर बंदी घालण्याची शिफरास केल्यानंतर गोलंदाजांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. चेंडूला लकाकी आणण्यासाठी वॅक्ससारख्या बाहेरील वस्तुचा वापर करावा किंवा नाही यासाठी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. 2018 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंवर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. याची आठवणही कुंबळे यांनी करून दिली.