लाहोर / वृत्तसंस्था
पाकिस्तानात लाहोरच्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अनारकली मार्केटमध्ये गुरुवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी बहुतांश जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर स्फोट एका दुचाकीवर झाला असल्याची माहिती प्राथमिक तपासाअंती स्पष्ट झाली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून तपास राष्ट्रीय दहशतवाद विरोधी विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
स्फोटाची घटना गुरुवारी दुपारी बाजारपेठेत गर्दी असताना घडली. बाजारपेठेतील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी मृतांचा आकडा 3 असल्याचे सुरुवातीला स्पष्ट केले. मात्र, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. तसेच या स्फोटात 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी बहुतांश जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता लाहोर पोलिसांचे प्रवक्ते राणा आरिफ यांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीवर संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तान सरकार आणि टीटीपी यांच्यातील युद्धविराम कराराची मुदत गेल्या महिन्यात संपली. त्यानंतर टीटीपीने हल्ल्यांची धमकी दिली होती. टीटीपीचे बहुतांश नेते आणि दहशतवादी सध्या अफगाणिस्तानात आहेत. अलीकडेच पाकिस्तानने लष्करी कारवाईत टीटीपीच्या माजी प्रवक्त्याला ठार केले होते. यानंतर दहशतवादी संघटनेने बदला घेण्याची धमकी दिली. अफगाण तालिबानने पाकिस्तान सरकारला टीटीपीसोबत चर्चेद्वारे समस्या सोडवण्यास सांगितले होते. अफगाण तालिबानने या प्रकरणाला पाकिस्तानचा अंतर्गत वाद म्हणत हस्तक्षेप किंवा मध्यस्थी करण्यास नकार दिला होता.