भारताच्या इतिहासातील पहिली हिम मॅरेथॉन हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्फिती येथे आयोजित केली जाणार आहे. 26 मार्चला हा इतिहास घडणार आहे. यावर्षी हिवाळा अधिक तीव्र असल्याने हिमाचल प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर हिम प्रात झाला आहे. त्यामुळे अशी मॅरेथॉन आयोजित करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. या मॅरेथॉनला देशभरातील धावपटू मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.
लाहोल-स्फितीमध्ये यंदा सर्व पर्वत शिखरे हिमाच्छादित झाली आहेत. तसेच चंद्रा नदीही पूर्णपणे गोठली आहे. आकाश निरभ्र असून त्यामुळे धावण्यासाठी उत्कृष्ट हवामान आहे. अशा स्थितीत ही मॅरेथॉन होत आहे. देशात प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने कुतुहलही मोठय़ा प्रमाणात आहे.
नेहमीच्या रस्त्यावरील मॅरेथॉनपेक्षा हिम मॅरेथॉन अधिक कठीण असते. बर्फावर पळणे किंवा चालणे सोपे नसते. पाय घसरून पडल्यास मोठय़ा प्रमाणात इजा होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन वैद्यकीय उपचारांची सोयही चोख ठेवण्यात आली आहे. या मॅरेथॉनमध्ये भाग घेणे रोमांचकारी अनुभव असतो, असे अनेक धावपटूंनी स्पष्ट केले. बर्फावर पळण्याचा सराव करण्यासाठी अनेक धावपटू आधीच येथे आलेले आहेत. त्यांना विशेष प्रकारचे प्रशिक्षणही दिले जात आहे. देशाची प्रगती शांतता आणि समृद्धीसाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.