बेन्झेमाचे दोन गोल, बार्सिलोनाला ओसासुनाकडून धक्का
वृत्तसंस्था/ माद्रिद
रियल माद्रिद 34 व्या वेळी ला लिगाचे चॅम्पियन बनले असून गुरुवारी झालेल्या सामन्यात करीम बेन्झेमाने नोंदवलेल्या दोन गोलांमुळे रियल माद्रिदने व्हिलारेलवर 2-1 असा विजय मिळविला. या लीगमधील त्यांचा अद्याप एक सामना बाकी असतानाच त्यांनी जेतेपद निश्चित केले आहे.
प्रेक्षकाविना खेळविण्यात आलेल्या या सामन्यात बेन्झेमाने 28 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवल्यानंतर दुसऱया सत्रात पेनल्टीवर एक गोल नोंदवला होता. त्याचे या मोसमात सर्व लीगमध्ये मिळून एकूण 26 गोल झाले आहेत. या विजयानंतर माद्रिदने बार्सिलोनावर 7 गुणांची आघाडी घेतली असून यामुळे बार्सिलोनाची या ट्रॉफीवरील दोन वर्षाची पकडही संपुष्टात आली आहे. बार्सिलोनाचा सामना ओसासुनाविरुद्ध होता. त्यात त्यांना विजय मिळविणे आणि रियल माद्रिद पराभूत होण्याची गरज होती. पण ओसासुनाने बार्सिलोनाला 2-1 असा अनपेक्षित पराभवाचा धक्का दिल्याने त्यांच्या अंधुक आशाही संपुष्टात आल्या. रियल माद्रिदने मात्र आपला सामना जिंकून 34 वे जेतेपदही निश्चित केले.
ओसासुनाविरुद्धच्या सामन्यात लायोनेस मेस्सीने बार्सिलोनाचा एकमेव गोल फ्रीकिकवर नोंदवला. रियल माद्रिदचे हे गेल्या बारा वर्षातील ला लिगाचे तिसरे जेतेपद आहे. कोरोना महामारीच्या ब्रेकनंतर 11 जूनपासून या स्पॅनिश लीगला पुनर्सुरुवात झाली होती. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सामन्यांत रियल माद्रिदने चमकदार प्रदर्शन केले असून प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने दहाच्या दहा सामने जिंकले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना फक्त चार गोल बहाल केले तर एकाही सामन्यात ते पिछाडीवर पडले नव्हते.