वृत्तसंस्था / बार्सिलोना
कोरोना महामारी संकटामुळे जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत अंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा हालचाली पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. स्पेन, इटली या देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घालताना हजारो लोकांचे बळी घेतले. लाखो जणांना या महामारीची लागण झाली असून अद्याप परिस्थिती नियंत्रणाखाली आलेली नाही. दरम्यात 2020-21 ला-लिगा फुटबॉल हंगामाला 12 सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात येईल, अशी घोषणा या स्पर्धेचे अध्यक्ष झेवियर तेबास यांनी केली आहे.
चालू वर्षातील लöलिगा फुटबॉल हंगामाला शासनाने गेल्या आठवडय़ात दिलेल्या परवानगीमुळे 11 जूनपासून पुन्हा प्रारंभ केला जाईल. ला-लिगा हंगाम 19 जुलैला समाप्त करण्यात येणार आहे. दरम्यान या स्पर्धेतील सामने बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकाविना आयोजित केले जाणार आहेत. 12 मार्चपासून कोरोना महामारीमुळे सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विविध फुटबॉल क्लबना 1.11 कोटी डॉलर्सच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ला-लिगा स्पर्धेतील बाकी राहिलेल्या 11 फेऱयातील सामने खेळविले गेले नाहीत तर क्लबना हा मोठा आर्थिक फटका बसणार आहे, असेही तेबास यांनी सांगितले.