बांगलादेश पहिल्या दिवसअखेर 4 बाद 253
वृत्तसंस्था/ चित्तगाँग
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पाकविरुद्ध यजमान बांगलादेशने पहिल्या डावात 4 बाद 253 धावा जमविल्या. शतकवीर लिटॉन दास आणि मुश्फिकूर रहीम यांनी पाचव्या गडय़ासाठी नोंदविलेल्या 204 धावांच्या भेद्य द्विशतकी भागीदारीमुळे बांगलादेशची स्थिती मजबूत झाली. दिवसअखेर दास 225 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 113 धावांवर तर रहीम 190 चेंडूत 10 चौकारांसह 82 धावांवर खेळत आहेत.
आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत दोन सामन्यांची ही मालिका खेळविली जात आहे. या पहिल्या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे पहिले चार फलंदाज केवळ 49 धावांत तंबूत परतले. डावातील पाचव्या षटकात पाकच्या शाहीन आफ्रिदीने सैफ हुसेनला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या.
त्यानंतर हसन अलीने एस. इस्लामला पायचीत केले. त्याने 3 चौकारांसह 14 धावांचे योगदान दिले. साजिद खानने कर्णधार मोमिनूल हकला केवळ 6 धावांवर मोहम्मद रिझवानकडे झेल देण्यास भाग पाडले. फईम अश्रफने नजमुल हुसेनला साजिद खानकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. बांगलादेशची यावेळी स्थिती 16.2 षटकात 4 बाद 49 अशी केविलवाणी होती.
मुश्फिकूर रहीम आणि लिटॉन दास या जोडीने बांगलादेशचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 204 धावांची भागीदारी केली. चहापानावेळी बांगलादेशने 4 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली होती. बांगलादेशच्या या दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके नोंदविली. चहापानानंतर शेवटच्या सत्रात रहीम आणि दास यांनी धावांची गती वाढविली. या शेवटच्या सत्रात बांगलादेशने 82 धावांची भर घातली.
डावातील 78 व्या षटकात लिटॉन दासने आपले शतक 199 चेंडूत पूर्ण केले. बांगलादेशने पहिल्या दिवसाअखेर 85 षटकात 4 बाद 253 धावा जमविल्या. या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी शेवटच्या दोन सत्रामध्ये पाकच्या गोलंदाजांना यश मिळाले नाही.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव- 85 षटकात 4 बाद 253 (लिटॉन दास खेळत आहे 113, मुशफिकर रहीम खेळत आहे 82, एस. इस्लाम 14, सैफ हसन 14, नजमुल हुसेन 14, मोमीनुल हक 6, शाहीन आफ्रिदी 1-50, हसन अली 1-38, फईम अश्रफ 1-38, साजिद खान 1-68)