जमशेदपूर/ वृत्तसंस्था
लिथुआनियाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटु नेरीजेस व्हॅलेसकीस लवकरच जमशेदपूर एफसी फुटबॉल संघात दाखल होणार आहे. व्हॅलेसकीस बरोबर जमशेदपूर एफसी संघाने आगामी दोन फुटबॉल हंगामासाठी करार केला आहे. 2019-20 च्या इंडियन सुपरलिग हंगामात व्हॅलेसकीस गोल्डन बुटचा मानकरी ठरला आहे.
व्हॅलेसकीस यापूर्वी इंडियन सुपरलिग स्पर्धेत चेन्नयीन एफसी संघातून खेळत होता. आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर त्याने इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत चेन्नयीन एफसी संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. त्याने 2019-20 च्या इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामात 15 गोल नोंदविले होते. जमशेदपूर एफसी संघाला चॅम्पियन ऑफ इंडिया बनविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. या क्लबची माझ्याकडून मोठी अपेक्षा असून त्याची पूर्तता करण्याकरिता मी जोरदार सरावाला त्वरित सुरूवात करणार असल्याचे व्हॅलेसकीसने म्हटले आहे. यापूर्वी व्हॅलेसकीसने लिथुआनिया, इस्त्रायल, बेलारूस, लॅटव्हिया, रूमानिया आणि पोलंडमधील विविध फुटबॉल क्लबचे प्रतिनिधीत्व केले आहे 2013 च्या फुटबॉल हंगामात व्हॅलेसकीसने लिग स्पर्धेतील 30 सामन्यात 27 गोल नोंदविले होते. व्हॅलेसकीसच्या समावेशामुळे जमशेदपूर एफसीचा संघ आता अधिक बळकट होणार आहे.