वृत्तसंस्था/ लिस्बन
येथे झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामन्यात लियॉनने बलाढय़ मँचेस्टर सिटीचा 3-1 अशा गोलफरकाने धक्कादायक पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. सलग चौथ्यांदा मँचेस्टर सिटीला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्यानंतर खेळाडूंना अश्रू आवरता आले नाहीत.
सर्वात महागडय़ा खेळाडूंचा संच असलेल्या सिटीला प्रेंच लीगमध्ये सातवे स्थान मिळविलेल्या लियॉन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. दशकभराच्या कालावधीनंतर प्रथमच चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठलेल्या लियॉनची पुढील लढत बायर्न म्युनिचशी होणार आहे. सिटीला या मोसमात फक्त लीग कप जिंकता आला आहे.
या सामन्यात 24 व्या मिनिटाला मॅक्सवेल कॉर्नेटने लियॉनला आघाडी मिळवून दिल्यानंतर 69 व्या मिनिटाला केव्हिन डी ब्रुईनने गोल नोंदवून सिटीला बरोबरी साधून दिली. डेम्बेलेने 79 व्या मिनिटाला लियॉनला पुन्हा आघाडी मिळवून दिली आणि सामना संपण्यास तीन मिनिटे असताना रहीम स्टर्लिंगने केलेल्या चुकीचा लाभ उठवत त्याने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवून सिटीचे आव्हान संपुष्टात आणले. येत्या बुधवारी त्यांची उपांत्य लढत म्युनिचशी होणार आहे. बायर्न म्युनिचने बार्सिलोनाचा 8-2 असा धुव्वा उडवित या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. बार्सिलोनाला सलग तिसऱयांदा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत लागले असून त्यांना युरोपियन यश मिळविण्यासाठी आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पॅरिस सेंट जर्मेन व आरबी लिपझिग यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून यावेळी इंग्लंडचा एकही संघ उपांत्य फेरीत खेळताना दिसणार नाही.