वृत्तसंस्था/ लिव्हरपूल
गुरुवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या सरावाच्या फुटबॉल सामन्यात लिव्हरपूल क्लबने ब्लॅकबर्न रोव्हर्सचा 6-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. पुढील आठवडय़ात इंग्लंडमध्ये प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेला फेरप्रारंभ केला जाणार आहे.
या स्पर्धेपूर्वी सरावासाठी वरील सामना आयोजित केला होता. गुरुवारच्या सामन्यात लिव्हरपूलतर्फे सॅडिओ मॅनी, नेबी किटा, जोएल मॅटिफ यांनी पूर्वार्धात प्रत्येकी एक गोल केला. त्यानंतर मिनामिनो, होएव्हर आणि क्लार्कसन यांनी खेळाच्या उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल नोंदविला. या सामन्यासाठी लिव्हरपूल संघाने हुकूमी फुटबॉलपटू मोहम्मद सलाह आणि अँडी रॉबर्टसन यांना विश्रांती दिली होती. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात लिव्हरपूलचा संघ 25 गुणांसह आघाडीवर असून त्यांना 30 वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर लिव्हरपूलचा सामना एव्हर्टनबरोबर 21 जूनला होणार आहे. या स्पर्धेत मँचेस्टर सिटी दुसऱया स्थानावर आहे.