लंडन / वृत्तसंस्था
लिव्हरपूलने साऊदम्प्टनला 2-1 अशा फरकाने मात देत प्रीमियर लीग जेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच रंगेल, याचे स्पष्ट संकेत दिले. सेंट मेरीज येथे झालेल्या लढतीत पराभव पत्करावा लागला तर मँचेस्टर सिटी चॅम्पियन्स ठरले असते, याची कल्पना असल्याने लिव्हरपूलने शनिवारी एफए कप फायनल खेळलेल्या आपल्या मागील संघात तब्बल 9 बदल केले आणि ही रणनीती त्यांच्यासाठी उत्तम फळली. लिव्हरपूलतर्फे ताकुमी मिनॅमिनोने 27 व्या मिनिटाला तर जोएल मॅतिपने 67 व्या मिनिटाला गोल केले. साऊदम्प्टनतर्फे एकमेव गोल नॅथन रेडमंडने 13 व्या मिनिटाला केला. तूर्तास, जेतेपद काबीज करणे आता लिव्हरपूलच्या हातात राहिले नसले तरी सिटीला आपली लढत गमवावी लागली किंवा अनिर्णीत सोडून द्यावी लागली आणि लिव्हरपूलच्या 3 वर्षातील दुसऱया जेतेपदावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मात्र, लिव्हरपूलप्रमाणे सिटीने ऍनफिल्ड येथे वॉल्व्हरहॅम्प्टन वांडरर्सला नमवले तर ते सहाव्यांदा चॅम्पियन ठरु शकतात.