वृत्तसंस्था/ लंडन
शनिवारी येथे झालेल्या एफए कम्युनिटी शिल्ड फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद अर्सेनल संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात अर्सेनलने लिव्हरपूलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. पण पिएरी इमरिक ऑबेमियांगने स्पॉट कीकवर अर्सेनलचा निर्णायक गोल केला.
या सामन्यात पिएरी इमरिकने पूर्वार्धात गोल करून अर्सेनलला आघाडीवर नेले. त्यानंतर उत्तरार्धात जपानच्या मिनामिनोने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये लिव्हरपूलच्या ब्रेवेस्टरचा फटका चुकला. त्यामुळे लिव्हरपूलला हा सामना गमवावा लागला. पिएरी इमरिकने स्पॉट कीकवर अचूक गोल नोंदवून अर्सेनलला विजेतेपद मिळवून दिले. ब्रिटनमध्ये प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेला 12 सप्टेंबरपासून प्रारंभ केला जाणार आहे.