वृत्तसंस्था/ लंडन
लिव्हरपूल फुटबॉल संघाने शनिवारी येथे इंग्लीश एफए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. विम्बले मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात लिव्हरपूलने पेनल्टी शूटआऊटमध्ये चेल्सीचा 6-5 अशा गोल फरकाने पराभव केला.
हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यातील निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत तसेच त्यानंतर जादा कालावधीत गोलफलक कोरा राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूट आऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूट आऊटमध्ये लिव्हरपूलने सहा तर चेल्सीने पाच गोल नोंदविले. पेनल्टी शूट आऊटमधील चेल्सीचा कर्णधार सिझरचा फटका गोलपोस्टच्या वरून गेल्याने चेल्सीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2006 नंतर लिव्हरपूल संघाने पहिल्यांदा एफए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूल संघ मँचेस्टर सिटी पेक्षा तीन गुणांनी पिछाडीवर असून त्यांचे दोन सामने बाकी आहेत. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. रियल माद्रीद क्लबने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूल यांच्यात अंतिम फेरीसाठी चुरस राहील.