नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे क्रीडा साहित्य बनविणाऱया चीनच्या लि निंग कंपनीबरोबरच्या कराराबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटना फेरविचार करणार आहे. चीनी बनावटीच्या कोणत्याही वस्तूंचा भारतामध्ये वापर न करण्यास शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आयपीएल स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते व्हिव्हो राहिल, असे क्रीडा अधिकाऱयांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. व्हिव्हो ही चिनी कंपनी आहे.
लडाख सरहद्दीवर नुकत्याच झालेल्या भारत आणि चीन लष्कराच्या चकमकीमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण भारतात चीन विरोधी निदर्शने होत असून चीनी बनावटीच्या कोणत्याही वस्तूंना देशात थारा दिला जाऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आवाहन केले आहे. चीनमधील लि निंग ही कंपनी क्रीडा क्षेत्रातील साहित्य उत्पादन करते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने लि निंग बरोबरच्या कराराबाबत फेरविचार करण्याचे ठरविले आहे. अशी माहिती आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले.
यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या होणाऱया वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये या समस्येवर अंतिम निर्णय घेतला जाईल. पण कोणत्याही परिस्थितीत देशाच्या निर्णयाला पहिले प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. आयपीएल ही सर्वात लोकप्रिय लीग असून चीनमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिव्हो हे त्याचे पुरस्कर्ते आहेत. आयपीएलने त्यांच्याशी केलेला करार संपविण्याची मागणी अनेकांनी केली आहे.