अंतिम लढतीत चेल्सीवर एकमेव गोलने मात, टीएलम्सनचा सर्वोत्कृष्ट गोल ठरला निर्णायक
वृत्तसंस्था/ लंडन
युरी टीएलमन्सने लांब पल्ल्यावरून मारलेल्या जबरदस्त स्ट्राईकच्या बळावर लीसेस्टर सिटीने एफए चषक स्पर्धेचे पहिल्यांदाच जेतेपद पटकावताना चेल्सीवर 1-0 असा विजय मिळविला. मार्च 2020 नंतर जमलेल्या सर्वात मोठय़ा गर्दीसमोर वेम्बली स्टेडियमवर लीसेस्टर सिटीने हे यश मिळविले.
यापूर्वी तीन वेळा लीसेस्टरने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि प्रत्येकी वेळी त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. 1969 मध्ये त्यांनी शेवटची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर त्यांनी तब्बल 52 वर्षांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 149 वर्षांच्या या स्पर्धेच्या इतिहासातील युरी टीएलमन्सने नोंदवलेला गोल सर्वोत्कृष्ट गोलपैकी एक मानला जात आहे. त्या बळावर लीसेस्टरने या स्पर्धेत पहिले यश मिळविले. या सामन्यातील 89 व्या मिनिटाला एक नाटय़ही घडले. लीसेस्टरच्या वेस मॉर्गनने आपल्याच जाळय़ात चेंडू धाडल्याने चेल्सीला सामना अतिरिक्त वेळेत जाणार असेच वाटले होते. पण व्हीएआरमध्ये चेल्सीचा खेळाडू ऑफसाईड असल्याचे स्पष्ट झाल्याने लीसेस्टरच्या जेतेपदावरही शिक्कामोर्तब झाले.
कोरोना महामारीच्या संकटामुळे गेले वर्षभर प्रेक्षकांविनाच फुटबॉल सामने खेळविण्यात आले आहेत. पण या अंतिम सामन्यात मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. तरीही गेल्या दीड वर्षातील प्रेक्षकांची सर्वाधिक उपस्थिती या सामन्याला होती. 90 हजार प्रेक्षकक्षमतेच्या या स्टेडियमवर 21000 चाहत्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे हा सामना फुटबॉलच्या अस्सल वातावरणात झाला, असे म्हणता येईल.
थॉमस टचेल यांच्या चेल्सीने या सामन्याच्या पूर्वार्धात वर्चस्व राखले होते. पण त्यांना संधी निर्माण करता आल्या नाहीत. 34 व्या मिनिटाला लीसेस्टरचा सेंटरहाफ जॉनी इव्हान्स जखमी झाल्याने त्याला बाहेर जावे लागले. तरीही चेल्सीला याचा लाभ उठवता आला नाही. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिल्यानंतर उत्तरार्धातही फारसे वेगळे चित्र नव्हते. गोलकोंडी फुटण्याची शक्यता दिसत नसतानाच 63 व्या मिनिटाला टीएलमन्सने प्रेक्षणीय गोल नोंदवून पहिले व एकमेव यश मिळविले. टीएलमन्सचा हा गोल मात्र या स्पर्धेतील आजवरचा सर्वोत्कृष्ट असल्याचे मानले जात आहे. मैदानाच्या मध्यातून त्याने चेंडूवर ताबा घेत आगेकूच केली आणि चेल्सीच्या बचावपटूंना हुलकावणी देत गोलच्या दिशेने जबरदस्त ड्राईव्ह मारला. गोलरक्षक केपे ऍरिझाबलागाने डाईव्ह मारत तो थोपविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही आणि चेंडूने जाळय़ाचा वेध घेतला. चेल्सीला मात्र हा गोल होण्याआधी चेंडू हाताळला गेलाय असे वाटत होते. तरीही त्यांना बरोबरी करण्याची संधी मिळाल्या होत्या. लीसेस्टरचा माजी खेळाडू व आता चेल्सीकडून खेळणाऱया बेन चिलवेलने मारलेला हेडर गोलपोस्टला लागला तर मेसन माऊंटचा फटका कॅस्पर श्मीचेलने अप्रतिम गोलरक्षण करीत वाया घालविला.
अखेरच्या टप्प्यात चेल्सीला आपण बरोबरीचा गोल नोंदवला असे वाटले होते. त्यांच्या चिलवेलचा क्रॉस क्लीअर करताना लीस्टरच्या कॅग्लर सोयुन्सुकेने मारलेला फटका मॉर्गनला लागून लीस्टरच्याच गोलपोस्टमध्ये गेला होता. मात्र रिव्हय़ूमध्ये चिलवेल ऑफसाईड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चेल्सीची निराशा झाली आणि लीसेस्टरला दिलासा मिळाला. काही क्षणानंतर सामना संपल्याची शिटी वाजल्यानंतर लीसेस्टरच्या खेळाडूंनी व समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला. 2016 मध्ये प्रिमियर लीगचे जेतेपद मिळविल्यानंतर लीसेस्टरचा हा सर्वात यशस्वी कालखंड ठरला आहे. त्यांचे प्रशिक्षक बेन्डान रॉजर्स यांचे इंग्लिश फुटबॉलमधील हे पहिलेच यश आहे. याआधी त्यांनी सेल्टिक संघासमवेत स्कॉटलंडमध्ये यश मिळविले होते. चेल्सीचे प्रशिक्षक टचेल यांना करंडक पटकावण्याची आणखी एक संधी मिळणार असून 29 मे रोजी पोर्टोमध्ये चेल्सीची मँचेस्टर सिटीविरुद्ध चॅम्पियन्स लीग जेतेपदाची लढत होणार आहे.