तृणमुल काँग्रेसमध्ये करणार प्रवेश : तत्पूर्वी आमदारकीचा देणार राजीनामा,बंगालमधून राज्यसभेसाठी भरणार अर्ज
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तसेच नावेली मतदारसंघाचे आमदार लुईझिन फालेरो हे आज सोमवारी तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून प्रवेशाच्या अगोदर ते आमदारपदाचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांना सादर करणार आहेत. त्यानंतर लागलीच बंगालला रवाना होऊन तेथून तृणमुल काँग्रेसतर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फालेरो यांच्या या मोठय़ा निर्णयामुळे काँग्रेसमध्ये हादऱयावर हादरे बसत आहेत, एवढेच नव्हे तर काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
आज संध्याकाळी 4.30 वा. पणजीत मॅरियॉट रिसॉर्टमध्ये फालेरो यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून त्यावेळी ते महत्वाची घोषणा करणार आहेत.
काँग्रेसकडून तृणमुल काँग्रेसकडे!
फालेरो यांची सर्व प्रकारची बोलणी तृणमुल काँग्रेसशी झाली आहे. अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. गोव्यातील एक ज्येष्ठ आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या फालेरो यांना पक्षात विश्वासात घेतले जात नव्हते. त्यांनी काँग्रेस सोडू नये, म्हणून राष्ट्रीय स्तरावरुनही प्रयत्न सुरु होते. मात्र फालेरो यांनी अखेर काँग्रेसपासून दूर जात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा काँग्रेस पक्षावर मोठा परिणाम होणार आहे.
अखेर काँग्रेस उभ्या फुटीच्या उंबरठय़ावर
फालेरो हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याबरोबर अन्य अनेक नेते, कार्यकर्तेही मोठय़ा संख्येत तृणमुलमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत जाहीर टीका केली आहे. हे सर्व नेते, कार्यकर्ते फालेरो यांच्या संपर्कात आहेत. फालेरो यांबरोबर हे सर्वजण तृणमुलमध्ये दाखल होणार आहे. एकंदरीत काँग्रेस पक्ष उभ्या फुटीच्या उंबरटय़ावर येऊन पोहोचला आहे. फालेरो यांचे राज्यातील अनेक ख्रिस्ती धर्मगुरुंशी चांगले संबंध असून त्याचाही लाभ उठविण्याचे तृणमुल काँग्रेसने ठरविले आहे.
फालेरोंकडे सोपविणार मोठय़ा जबाबदारी
लुईझिन फालेरो यांच्या नेतृत्वाचा तृणमुलने चांगला लाभ उठविण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांच्यावर मोठय़ा जबाबदारीही सोपविण्यात येणार आहेत. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले यश पदरात पाडून घेण्याला प्राधान्यक्रम देण्यात येईल. त्यानंतर पुर्वोत्तर राज्यांमध्ये तृणमुलला मजबूत करण्याचे कामही त्यांच्याकडे सोपविले जाणार आहे. त्या अगोदर त्यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.
सोनिया गांधींचे निकटचे समर्थक
लुईझिन फालेरो हे श्रीमती सोनिया गांधी यांचे जवळचे समर्थक मानले जात होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडू नये यासाठी दिल्लीतून प्रयत्न जारी होते. मात्र, त्या प्रयत्नांना विशेष यश आलेले नाही. आत्ता ते निर्णायक वळणावर येऊन उभे ठाकले असून काँग्रेस उभ्या फुटीच्या उंबरटय़ावर येऊन पोहोचला आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना हटविण्याची मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केली होती. मात्र, पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी या मागणीला विशेष दाद दिलेली नाही. लुईझिन फालेरो, रवी नाईक, प्रतापसिंह राणे या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्षात योग्य वागणूक मिळत नाही अशी टीका त्यांच्या समर्थकांनी गेल्या दोन दिवसामागेच केली होती. त्यात लुईझिन फालेरो यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याने ते तृणमुल काँग्रेसकडे जाणार असल्याचे संकेत मिळाले होते.
तिघेजण पोहोचले तीन ठिकाणी
2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लुईझिन फालेरो हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र, त्यावेळी प्रतिमा कुतिन्हो, उर्फान मुल्ला तसेच इतर कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह करून निवडणुकींच्या रिंगणात आणले व ते विजयी झाले. त्यानंतर झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रतिमा कुतिन्हो यांचा पराभव झाला व त्यांचे लुईझिन फालेरो यांच्याकडे भिनसले आणि प्रतिमाने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर उर्फान मुल्ला यांनी ही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला जोरदार हादरे बसू लागले आहेत. त्यातून पक्ष कसा मार्गक्रमण करतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.