प्रतिनिधी/ पणजी
माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेसाठी नामांकन दाखल करण्यात आले आहे. एका ट्विटद्वारे पक्षाने तशी माहिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे फालेरो यांची राज्यसभेसाठी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देतानाच नावेली मतदारसंघातील आपल्या आमदारकीचाही राजीनामा देऊन फालेरो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता त्यांचे नामांकन दाखल करण्यात आले आहे.
अशाप्रकारे गोव्यातून थेट राज्यसभेवर जाणारे मनोहर पर्रीकर नंतर फालेरो हे दुसरे गोमंतकीय ठरणार असून एकाचवेळी राज्यसभेचे दोन गोमंतकीय खासदार असण्याचीही ही दुसरी वेळ ठरणार आहे.
दरम्यान, फालेरो यांच्या या निवडीमुळे ते नावेलीतून लढणार नाही हेही स्पष्ट झाले असून यंदा नावेलीला आमदार म्हणून नवा चेहरा मिळणार आहे. मात्र तो फालेरोंचाच प्रतिचेहरा असेल की अन्य पक्षांना तेथे संधी मिळेल यावर निवडणूक निकालानंतरच शिक्कामोर्तब होणार आहे.
आपल्यावर दाखविलेल्या या विश्वासाबद्दल श्री. फालेरो यांनी ममता बॅनर्जी यांचे आभार व्यक्त केले आहे. या माध्यमातून गोमंतकीयांचा आवाज खंबीरपणे केंद्रात पोहोचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करेन असे फालेरो यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. फालेरो यांच्या या निवडीबद्दल टेनिस स्टार लिएंंडर पेस यांच्यासह पक्षाच्या गोव्यातील नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गोवा राज्यप्रमुखपदी महुआ मोईत्रा
दरम्यान, तृणमूलच्या गोवा राज्यप्रमुखपदी श्रीमती महुआ मोईत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोईत्रा या कृष्णननगर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे.