प्रतिनिधी/ खेड
कमी किंमतीत सोने देण्याच्या आमिषाने चौघांना चाकूचा धाक दाखवत 59 लाखाची रोकड लुटणाऱया टोळीतील 12जणांच्या मुसक्या आवळल्यानंतर लुटीतील रोकड हस्तगत करण्यासाठी येथील पोलिसांनी फिल्डींग लावली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 36 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. उर्वरित रोकडचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असून साऱया शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे.
लुटीतील मुख्य सूत्रधार किशोर पवार व अन्य फरारी साथीदार सत्यवान जनार्दन साळुंखे, सचिन लहू जाधव यांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्यानंतर तिघांकडून 28 लाख 5 हजार 900 रूपयांची रोकड, कार, मोबाईल असा 33 लाख 9 हजार 440 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी मुख्य सूत्रधार किशोर पवार याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर काही रोकड हस्तगत करण्यात आल्याचे समजते. मात्र नेमकी किती रोकड हाती लागली? याचा तपशील उपलब्ध झालेला नाही.
लुटीतील उर्वरीत रोकडही लवकरच हस्तगत करू, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करत आहेत.