ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लुधियानाच्या न्यायालय परिसरात स्फोट घडविण्याचा संपूर्ण कट पंजाबमधील सर्वात मोठा मध्यवर्ती तुरुंग असलेल्या लुधियाना येथे रचला गेला. या स्फोटाचा संबंध पाकिस्तानशी आहे. स्फोटादरम्यान ठार झालेला माजी हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग याला लुधियानाच्या मध्यवर्ती कारागृहातील बीकेयू 4 मध्ये कुख्यात तस्कर रणजितबाबा उर्फ चिता आणि आरडीएक्सच्या प्रकरणात आरोपी सुखविंदर सिंग उर्फ बॉक्सर यांच्यासोबत ठेवण्यात आले होते.
या स्फोटात ठार झालेल्या गगनदीप सिंगला एसटीएफच्या पथकाने 24 ऑगस्ट 2019 रोजी अटक केली होती. आरोपींच्या चौकशीदरम्यान त्याच्या आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली. तुरुंगातील आरोपी गगनदीप सिंग याला अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिता आणि बॉक्सरसह बराकीत ठेवण्यात आले होते. या तिघांमध्ये खूप चांगले संबंध होते. आरोपींनी गगनदीप सिंग याला चिता आणि बॉक्सरने मोठी स्वप्न दाखविण्यास सुरूवात केली. तसेच पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या प्रमुखाबद्दल सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिताने पाकिस्तानात बसलेल्या स्मगलर रिंदाशी गगणदीपची चर्चा घडवून आणली. त्यानंतर गगणदीपला तुरुंगाबाहेर जाऊन त्यांच्यासाठी काम करण्यास सांगितले. त्यानंतर तुरुंगात बसून आरोपींनी महानगरात स्फोटाची योजना आखली आणि गगनदीप सिंग याला पैशाचे आमिष दाखवले. सप्टेंबरमध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही आरोपी गगनदीप सिंग सतत फोनवरून तुरुंगातील चिताच्या संपर्कात होता. तिथून हा स्फोट कोर्टात होणार असल्याची माहिती देण्यात आली आणि स्फोट करण्यासाठी माल कुठे घ्यायचा आणि किती वाजता तसेच स्फोट कसा करायचा याची माहिती त्याला देण्यात आली होती.