पंजाबमध्ये लुधियानाच्या गिल विधानसभा मतदारसंघात यंदा दोन माजी अधिकाऱयांमध्ये राजकीय लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपने सुच्चा राम लाधर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने विद्यमान आमदार कुलदीप सिंह वैद्य यांच्यावरच विश्वास दाखविला आहे. पंजाब कॅडरच्या 1991 च्या तुकडीचे 63 वर्षीय अधिकारी लाधर यांनी आपण लोकांची सेवा करत राहण्याचा निश्चय केला असल्याचे म्हटले आहे.
या मतदारसंघात लाधर यांची लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार वैद्य यांच्याशी होणार आहे. वैद्य यांचे बंधू सरबजीत हे शनिवारीच भाजपमध्ये सामील झाले आहेत. एमटेकचे शिक्षण पूर्ण केल्यावर लाधर यांनी 1982 मध्ये पंजाबच्या सिंचन विभागात काम करणे सुरू केले होते. तेथे काही वर्षे काम केल्यावर 1991 मध्ये ते आयएएस अधिकारी झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती उपविभागीय दंडाधिकारी म्हणून लुधियानात झाली होती. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी 1,178 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱया प्रमुख नेत्यांमध्ये मुख्यमंत्री तसेच काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंह, शिअद नेते सुखबीर बादल यांचा समावेश आहे. शिअद नेते विक्रम मजीठिया यांच्या पत्नीनेही उमेदवारी अर्ज भरला आहे.