गिल मतदारसंघात निवृत्त आयएएस अधिकारी गंभीर जखमी : गाडीचे नुकसान
पंजाबच्या लुधियानामधील गिल मतदारसंघातील भाजप उमेदवार एसआर लद्दड यांच्यावर प्रचारादरम्यान जीवघेणा हल्ला झाला आहे. लद्दड यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. हल्ल्यात जखमी झाल्याने लद्दड बेशुद्ध झाल्याने समर्थकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी अमृतसरमध्ये भाजप उमेदवार आयएएस राजू यांनीही पत्नी आणि मुलीवर हल्ला झाल्याचा आरोप केला होता.
रविवारी रात्री लुधियानाच्या गिल मतदारसंघातील उमेदवार लद्दड यांच्यावर खेडी गावात तलवारांनी हल्ला करण्यात आला. प्रचार करत असताना लद्दड यांच्यावर बाइकस्वारांनी धारदार अस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. हल्ल्यात लद्दड गंभीर जखमी झाले आहेत.
अमृतसरमध्ये कुटुंबीयांवर हल्ला
यापूर्वी पंजाबमधील सर्वात लक्षवेधी मतदारसंघ अमृतसर पूर्वमधील भाजप उमेदवार निवृत्त आयएएस डॉ. जगमोहन राजू यांनी विक्रम मजीठिया यांच्यावर धमकाविण्याचा आणि पत्नीवर हल्ला करविण्याचा आरोप केला आहे. यावरून राजू यांनी धरणे आंदोलन देखील केले आहे. आपण मुलगी, सून आणि अन्य समर्थकांसोबत मोहकमपुरामध्ये प्रचार करत असताना काही युवकांनी सून आणि मुलीचा पाठलाग सुरू केला. त्यांनी अभद्र भाषेचा वापर केला. तर काही गुंडांनी आमच्या चालकाकडून चावी काढून घेतली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यालाही धमकाविल्याचा आरोप डॉ. राजू यांच्या पत्नी अनू यांनी केला आहे.
फिरोजपूरमध्येही घटना
फिरोजपूरच्या भारतनगरमध्येही शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या जाहीर सभेतून परतणारे समर्थक अमन कल्याण यांच्यावर काही जणांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्याण यांच्या डोक्याला ईजा झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.