शक्तिशाली स्फोटात दोघांचा मृत्यू : आत्मघाती हल्ल्याचा संशय
अतिदक्षता…
- पोलीस-एनएसजीसह एनआयएकडून तपासकार्य
- स्फोटानंतर संपूर्ण पंजाबमध्ये अतिदक्षतेचे आदेश
- केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याकडे मागितला अहवाल
लुधियाना / वृत्तसंस्था
पंजाबमधील लुधियाना सत्र व जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दोन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. न्यायालय इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील स्वच्छतागृहात बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्वत्र धावपळ उडाली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की इमारतीची भिंत कोसळली असून काचेच्या खिडक्मयाही फुटल्या आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना असल्याच्या शक्यतेने एनएसजी आणि एनआयएकडून तपास हाती घेण्यात आला आहे. मात्र, तातडीने या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्विकारली नव्हती.
लुधियानाच्या जिल्हा न्यायालयात गुरुवारी झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. याला अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिला नसला तरी दिल्लीतील एनएसजी, नॅशनल बॉम्ब डेटा सेंटर आणि चंदिगढहून एनआयएच्या दोन सदस्यीय टीमने घटनास्थळी दाखल होत तातडीने तपास हाती घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेही याप्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांच्यासह पंजाबच्या डीजीपींनी लुधियानात दाखल होत घटना आणि सुरक्षेचा आढावा घेतला. सुरुवातीला या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता. मात्र, सायंकाळी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दगावणाऱयांचा आकडा दोन झाला आहे. तसेच दोन महिलांसह अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या स्फोटात जखमी झालेल्यांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. लुधियानामधील राजकोट गावातील संदीप कौर (31 वर्षे) आणि जमालपूर येथील शरणजीत कौर (25 वर्षे) यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर मनीष कुमार (32 वर्षे), कुलदीप सिंग मांड (50 वर्षे) आणि कृष्ण खन्ना (75 वर्षे) या अन्य जखमींना खासगी इस्पितळात दाखल केले आहे.
संपामुळे न्यायालयात गर्दी कमी
वकिलांच्या संपामुळे गुरुवारी सामान्य दिवसांच्या तुलनेत येथे गर्दी कमी होती. तिसऱया मजल्यावरील कोर्ट क्रमांक 9 जवळील स्वच्छतागृहात हा स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण न्यायालयाची इमारत हादरली. इमारतीच्या खिडक्मयांच्या काचा फुटल्या असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ांचेही नुकसान झाले आहे. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी सिलिंडर फुटल्याची भीतीही व्यक्त केली. या स्फोटाबाबत पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱयांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तथापि, स्फोटाच्या आवाजानंतर न्यायालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
आत्मघाती बॉम्बरकडून स्फोटाची शक्यता
स्फोटानंतर तपासादरम्यान तिसऱया मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहाच्या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱयामध्ये एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह आत्मघाती हल्लेखोराचा असल्याचा संशय आहे. स्फोटात या कथित आत्मघाती हल्लेखोराचे धड आणि पाय निकामी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या इसमानेच स्फोटके पेरण्याचा प्रयत्न करताना स्फोट झाला असावा अशी शक्यता पोलीस आयुक्त भुल्लर यांनी व्यक्त केली.
फॉरेन्सिक तपास सुरू
प्राथमिक तपासात घटनास्थळी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता, त्याच्याकडे स्फोटके असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. फॉरेन्सिक टीमने मृतदेहाची तपासणी सुरू केली आहे. तपासणीअंतीच सदर मृतदेह आत्मघाती बॉम्बरचा आहे की नाही याची पुष्टी होणार आहे. सध्या या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे.
…हा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री चन्नी
लुधियानामधील स्फोटाच्या ठिकाणाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी हा अराजकता पसरवण्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अस्थिरता माजवून लोकांमध्ये घबराट पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या स्फोटामागे कोणती संघटना किंवा टोळी आहे, याचा तपास सुरू असल्याचेही सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांचा पाकिस्तानवर संशय
फॉरेन्सिक टीम घटनास्थळाचा तपास करत आहे. आपल्या राज्याची सीमा दुसऱया देशाला लागून आहे, त्यामुळे या स्फोटात परकीय शक्तींचा हात असण्याची शक्मयता पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर व्यक्त केली. तसेच या घटनांना तोंड देण्यासाठी पोलीस पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटाची दखल घेत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या सर्व न्यायालयांमध्ये सुरक्षा वाढवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच पंजाब आणि हरियाणाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची बैठक बोलावण्यात आली आहे. पंजाब उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलने या घटनेची एसआयटीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच एसआयटीची कमान निवृत्त न्यायाधीशांकडे देण्याची विनंती करण्यात आली आहे.