ऑनलाईन टीम / तरुण भारत
लुधियाना कॉर्टात झालेल्या बॉमस्फोट प्रकरणी जर्मनीतील शीख फॉर जस्टिस दहशतवादी जसविंदर सिंग मुलतानी याला अटक करण्यात आली आहे. त्याला जर्मनीतील एरफर्ट येथून फेडरल पोलिसांनी अटक केली. लुधियाना कॉर्टातील एका खोलीत झालेल्या बॉम्बस्फोटाची योजना पाक गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर हरविंदर सिंग रिंदा यांच्यामार्फत आखली असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली असुन, याबाबतच्या चौकशीकरीता भारतीय यंत्रणा गतीमान झाली असुन चौकशीसाठी तपास यंत्रणा लवकरच जर्मनीला जाऊ शकते.
सद्या मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मुलतानी याने दिल्ली आणि मुंबईतही बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर केंद्र सरकारच्या आवाहनावरून त्याला अटक करण्यात आली. या मुलतानीवर खलिस्तान समर्थक तसेच नीवर पंजाब सीमेवरून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची पाकिस्तानमार्गे भारतात तस्करी केल्याचाही आरोप आहे.
लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्समधील बॉम्बस्फोटाच्या प्राथमिक तपासात केंद्र आणि पंजाब एजन्सींना मुलतानी आणि रिंदा यांनी कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली असुन मुलतानी हा पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील मन्सूरपूर या गावचा रहिवासी आहे. मुलतानी पंजाबमार्गे पाकिस्तानातील आपल्या नेटवर्कद्वारे भारतात शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करत होता. असे ही अत्तापर्यंत स्पष्ट झाले आहे.