आयएसआयच्या निर्देशावर ड्रगतस्करांसोबत रचला कट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लुधियाना स्फोटप्रकरणी जर्मनीतून शीख फॉर जस्टिसचा (एसएफजे) दहशतवादी जसविंदर सिंह मुल्तानीला अटक करण्यात आली आहे. मुल्तानीला पोलिसांनी मध्य जर्मनीच्या एरफर्ट येथून ताब्यात घेतले आहे. लुधियाना बॉम्बस्फोटाच्या प्रारंभिक तपासात मुल्तानीचे नाव समोर आले होते.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि तेथे लपून बसलेला गँगस्टर हरविंदर सिंह रिंदाद्वारे लुधियाना बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. मुल्तानीच्या चौकशीसाठी भारतीय तपासयंत्रणा लवकरच जर्मनीला रवाना होतील. लुधियाना स्फोटासाठी पंजाब पोलीस दलातून बडतर्फ हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंहला तयार करण्यात आले होते.
दिल्ली आणि मुंबईत स्फोट घडवून आणण्याचा कट देखील मुल्तानी रचत होता असे प्रारंभिक तपासात समोर आल्यावर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार जर्मनी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. मुल्तानीवर पाकिस्तानमधून भारतात शस्त्रास्त्रs आणि अमली पदार्थांची तस्करी घडविण्याचा देखील आरोप आहे. हरविंदर सिंह उर्फ रिंदा संधू हा बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वधावा सिंह बब्बरशी जोडला गेलेला आहे.
मुल्तानी अन् रिंदाने रचला कट
लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रारंभिक तपासात केंद्र तसेच पंजाबच्या सुरक्षा यंत्रणांना याचा कट मुल्तानी आणि रिंदाने रचल्याचे समजले होते. स्फोटाद्वारे पंजाबला निवडणुकीपूर्वी अस्थिर करण्याचा कट होता. मुल्तानी हा पंजाबच्या होशियारपूर जिल्हातील मंसुरपूर गावाचा रहिवासी आहे. मुल्तानी पाकिस्तानातील स्वतःच्या हस्तकांद्वारे भारतात पंजाबमार्गे शस्त्रास्त्रs अन् अमली पदार्थांची तस्करी करवत होता. तर रिंदा हा पंजाबसह महाराष्ट्र, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्येही वाँटेड आहे.
शेतकरी नेता होता टार्गेटवर
मुल्तानीने शेतकरी आंदोलन भडकविण्यासाठी शेतकरी नेते बलवीर राजेवाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. याप्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये 5 जणांना अटक केली होती. या आरोपींपैकी एक जीवन सिंहला मुल्तानीनेच फुटिरवादी कारवायांमध्ये सामील केले होते. मुल्तानीने सोशल मीडियावरून संपर्क करत शेतकरी नेत्याला लक्ष्य करण्याची जबाबदारी जीवनवर सोपविली होती.
इंटरनेट कॉलमध्ये कटाचा खुलासा
लुधियानात स्फोट घडविणाऱया गगनदीप सिंहकडून तपास यंत्रणांनी एक डोंगल हस्तगत केला होता. याच्या तपासात डोंगलद्वारे 13 इंटरनेट कॉल करण्यात आल्याचे आढळून आले. हे कॉल दुबई, मलेशिया आणि पाकिस्तानच्या क्रमांकावर झाले होते. यातून पाकिस्तानातील ड्रग्स तस्कर आणि खलिस्तानवाद्यांनी स्फोटाचा कट रचला होता हे स्पष्ट झाले.