प्रतिनिधी /बेळगाव
गोवावेस येथील लेकव्हय़ू हॉस्पिटलतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. ‘आमचा ग्रह आमचे आरोग्य’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रुग्णालयाच्या इमारतीवर केलेल्या टेरेस गार्डनचे उद्घाटन करण्यात आले. निवृत्त फलोत्पादन अधिकारी के. एस. पाटील यांनी रोपटय़ाला पाणी घालून याचे उद्घाटन केले.
हॉस्पिटलचे संचालक, सीईओ डॉ. शशिकांत कुलगोड म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात 4 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. आज सगळीकडे पर्यावरणाचा ऱहास होत असून पर्यावरण वाचविण्यासाठी इको क्लब तयार करून इको वॉरिअर होण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवृत्त शहर अभियंता देवेंद्र हलगी, प्रकाश कुलकर्णी, गीता कड्डी यांनी आपले अनुभव कथन केले. ज्या काळात नातेवाईक जवळ येण्यास घाबरत होते. त्या काळात लेकक्हय़ूच्या कर्मचारी व डॉक्टरांनी सेवा दिल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. के. एस. माने, डॉ. प्रदीप वगराळी, डॉ. आनंद सकाळ, डॉ. गोविंद हंचीमनी यासह इतर उपस्थित होते.