ऑनलाईन टीम / बैरुत :
लेबननची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या अमोनियम नायट्रेटच्या भीषण स्फोटानंतर माहिती व प्रसारण मंत्री मनाल अब्देल समाद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बैरूत बंदराच्या वॉटरफ्रंट हँगरमध्ये शेकडो टन अमोनियम नायट्रेट साठवण्यात आले होते. त्याच्या स्फोटामुळे 160 लोक मृत्युमुखी पडले. तर 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बैरूतच्या समुद्रकिनाऱ्यासह शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या स्फोटामागे सरकारचे गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराला जबाबदार धरण्यात आले असून, सत्ताधारी लोकांविरुद्ध जनतेचा संताप वाढत चालला आहे. सरकारविरोधात मोर्चे निघत असून, आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर तेथील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास अपयश आल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे समाद यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. तर या भीषण स्फोट प्रकरणी संपूर्ण सरकारनेच पायउतार व्हायला पाहिजे, अशी मागणी लेबेननमधील मारोनाईट चर्चने केली आहे.