वृत्तसंस्था/ लंडन
2022 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सध्या विविध ठिकाणी चालू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील चालू आठवडाअखेर होणाऱया इंग्लंड विरूद्धच्या फुटबॉल सामन्यात पोलंडचा हुकमी स्ट्रायकर रॉबर्ट लेवान्डोवस्की दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. रविवारी पात्र फेरीच्या पोलंड आणि अँडोरा यांच्यातील सामन्यात खेळताना लेवान्डोवस्कीच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
इंग्लंडविरूद्ध होणाऱया सामन्यात पोलंडला लेवान्डोवस्कीची उणीव निश्तिच भासणार आहे. त्याची दुखापत पूर्ण बरी होण्यास किमान दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याने तो येत्या बुधवारी लंडनमध्ये होणाऱया इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. 32 वर्षीय लेवान्डोवस्कीने 2021 च्या फुटबॉल हंगामात विविध स्पर्धामध्ये बायर्न म्युनिच संघाकडून खेळताना 42 गोल नोंदविले आहेत. रविवारच्या पात्र फेरीच्या सामन्यात पोलंडने अँडोराचा 3-0 असा पराभव केला होता. या सामन्यात लेवान्डोवस्कीने दोन गोल नोंदविले होते.