वृत्तसंस्था/पॅरीस
2021 च्या फुटबॉल हंगामासाठी बायर्न म्युनिच संघाचे 33 वर्षीय फुटबॉलपटू रॉबर्ट लेवान्डोवस्की तसेच महिलांच्या विभागात बार्सिलोना संघाची कर्णधार ऍलेक्सीया पुटेलास यांची फिफातर्फे अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या वर्षीच्या बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम लेवान्डोवस्कीने नोंदविला होता. लेवान्डोवस्कीने फिफाचा हा पुरस्कार दुसऱयांदा पटकाविताना आपले प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाचा मेसी तसेच इजिप्तचा मोहम्मद सालाह यांना मागे टाकले. लेवान्डोवस्की हा पोलंडचा फुटबॉलपटू आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये बॅलन डीओर पुरस्कार मिळविताना मेसीने लेवान्डोवस्कीला मागे टाकले होते.
बार्सिलोना महिला संघाची कर्णधार ऍलेक्सीया पुटेलास हिची 2020-21 च्या फुटबॉल हंगामातील कामगिरी दर्जेदार झाली असून तिने बार्सिलोना संघाला स्पॅनीश लीग स्पर्धेचे तसेच चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले आहे. या कामगिरीबद्दल फिफाने तिची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्काराने सन्मानित केले.