नुब्रा येथे उणे 20 अंशांमुळे झराच गोठला : आई क्लायम्बिंग फेस्टिव्हल
लेह-लडाखचा उल्लेख होताच एक स्पर्शरहित सौंदर्याचे दृश्य मनःचक्षूंसमोर उभे राहते. उन्हाळय़ात पर्यटकांमधील हे सर्वात पसंतीचे ठिकाण आहे, तेथे बाईकने प्रवास, हायकिंग करणे, पँगोंग सरोवर नुब्रा खोऱयात जाणे हा कधीच न विसरता येणारा अनुभव आहे. हिवाळय़ात तेथे तापमान शून्याच्या अनेक अंश खाली तापमान असते आणि तेथे पोहोचणे अत्यंत अवघड. पण आता हे ठिकाण डिसेंबर-जानेवारीच्या हिवाळय़ातही साहसी खेळांसाठी अनुकूल ठरू लागले आहे. अलिकडेच नुब्रा खोऱयात उणे 20 अंश तापमानामुळे गोठलेल्या ओढय़ांदरम्यान आइस क्लायम्बिंग महोत्सव पार पडला आहे.
सद्यकाळात आइस क्लायम्बिंग सारख्या गोष्टींसाठी पर्यटकांना युरोप, कॅनडा तसेच अन्य देशांमध्ये जावे लागते. पण, लडाखमध्येही आता अशाप्रकारच्या साहसी क्रीडाप्रकारांना चालना दिली जात आहे. लडाखला वर्षभर पर्यटकांसाठी विशेष ठिकाण ठरविण्याचा प्रयत्न असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
सियाचीननजीक खोरे
नुब्रा खोरे सियाचीन ग्लेशियरनजीक असल्यानेही प्रसिद्ध आहे. हे ग्लेशियर नुब्राच्या उत्तर दिशेला आहे. पूर्ण सियाचिन भागात हिवाळी साहसी क्रीडाप्रकारांसाठी अनेक जागा आहेत. हिवाळय़ात नुब्रा खोऱयातील तापमान उणे 20 अंशांपर्यंत खालावते, यामुळे तेथील ओढे आणि पाण्याचे अन्य स्रोत गोठतात. अशा स्थितीत तेथे सहजपणे आइस क्लायम्बिंगसारखे क्रीडाप्रकार होऊ शकतात.
नुब्रा खोऱयाविषयी..
लडाखच्या उंच शिखरांनी घेरलेल्या देशाच्या अद्भूत आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे नुब्रा खोरे. नुब्राचा अर्थ ‘फुलांचा खोरे’ असा होतो. तसेच याला लडाखची बाग या नावानेही ओळखले जाते. गुलाबी आणि पिवळय़ा जंगली गुलाबांनी सजलेले हे खोरे लेहपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. नुब्रा खोरे श्योक आणि सियाचिन या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
कसे जाल?
नुब्रा खोऱयात जाण्यासाठी रस्तेमार्ग हा एकच पर्याय आहे. राष्ट्रीय महामार्गापासुन खर्दुंग खिंडीपर्यंत जाता येते. हा मार्ग काहीसा अवघड असला तरीही रोमांचक आहे.