न्यायालयात जाऊन आदेश आणण्याचा युवतीला दिला सल्ला
प्रतिनिधी / पणजी
लग्नाचे आमिष देऊन गेली 6 वर्षे लैंगिक उपभोग घेणाऱया त्या पत्रकाराविरुद्ध पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यास तयार नसून न्यायालयात जाऊन गुन्हा नोंदवून घेण्यासाठी आदेश आणावा, असा सल्ला पोलिसांनी पीडितेला दिला आहे.
पाच वर्षांपूर्वी सदर पत्रकाराविरुद्ध 6 युवतींनी तक्रार दिली होती. लग्नाचे आमिष दाखवून सदर संशयिताने त्या युवतींशी सलगी वाढवून गैरफायदा घेतला. संशयित आरोपी विवाहित असून त्याची अनेक प्रकरणे असल्याचे समजताच त्यांनी महिला पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी चार गुन्हे नोंदवून घेतले होते.
त्या प्रकरणात सदर संशयिताला जेव्हा अटक झाली होती तेव्हा आरोपीच्या समर्थनात सदर पीडिता सर्वात पुढे होती. लैंगिक अत्याचारावर गेली सहा वर्षे पांघरुन घालून आता तक्रार नोंदविण्यासारखे काय घडले, अशी विचारणा पोलिसांनी त्या पीडित युवतीकडे केली आहे.
पोलीस स्थानकात सादर केलेली तक्रार पोलिसांनी नोंद करुन घेतलीच पाहिजे असा कायदा सांगतो. जर पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीत तर तक्रारदार न्यायालयाचे दरवाजे ठोठवून गुन्हा नोंदवून घेण्यासाठीचा आदेश न्यायालयाकडून आणू शकतात. कायद्यातील या व्यवस्थेचा फायदा घेऊन तक्रारदाराने न्यायालयात जाऊन योग्य तो आदेश आणावा, असा सल्ला देऊन पोलिसांनी त्या पीडितेला हाकलून दिले.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडे चौकशी केली असता अभियोक्ता संचलनालयाकडून कायदेशीर सल्ला मागितला जाईल व त्या सल्ल्याप्रमाणे कृती केली जाईल तो पर्यंत संशयित आरोपी अटकपूर्व जामीन घेण्यास मोकळा असल्याचे ते म्हणाले.