बृजभूषण शरण सिंह यांनी सरकारला पाठवले उत्तर ः क्रीडामंत्र्यांची खेळाडूंसोबत चर्चा सुरूच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे प्रकरण अधिकच चिघळल्यानंतर ‘आयओए’ने चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी केली. डब्ल्यूएफआय आणि कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादात क्रीडामंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत कुस्तीपटूंसमवेत चर्चा केली. मात्र, तरीही कोणताही अंतिम तोडगा निघालेला दिसत नाही. गुरुवारीही खेळाडू आणि क्रीडामंत्री यांच्यात दोन तास चर्चा झाली होती.
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप करणारे आंदोलनकर्ते आपल्या पवित्र्यावर ठाम असल्याचे शुक्रवारी रात्रीपर्यंत दिसून येत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी शुक्रवारी होणारी पत्रकार परिषद रद्द केली आहे. आता 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱया भारतीय कुस्ती महासंघाच्या (आयएफआय) वार्षिक बैठकीनंतर ते मीडियाशी बोलणार आहेत. तत्पूर्वी बृजभूषण शरण सिंह यांनी आपले लेखी उत्तर क्रीडा मंत्रालयाला पाठवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सात सदस्यीय समिती
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) बैठकीत कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. बॉक्सर मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव यांच्यासह दोन वकिलांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
बृजभूषण यांच्या पत्रकार परिषदेचा ‘खेळखंडोबा’
बृजभूषण सिंह यांची 4 वाजल्यापासून होणारी पत्रकार परिषद रात्रीपर्यंतही सुरू होऊ शकली नाही. पत्रकार परिषद रद्द करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पत्रकार परिषदेची वेळ बदलण्याचा संदेश प्रसारमाध्यम प्रतिनिधींना अनेकवेळा मिळत राहिला. सुरुवातील 4.30, नंतर 5, 6, 6.30 आणि नंतर 7 वाजता मेसेज आला. मात्र, त्यानंतरही पत्रकार परिषद न झाल्याने सर्वांचाच ‘खेळखंडोबा’ झाला. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेल्या बृजभूषण शरण सिंह यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. तसेच ‘मी तोंड उघडले तर सुनामी येईल. माझ्या पाठीशीही अनेक खेळाडू आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते.
नॅशनल चॅम्पियनशिपमधून 200 कुस्तीपटूंची माघार
या वादाचा परिणाम उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेवरही झाला आहे. चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी गेलेले दिल्ली, हरियाणा आणि पंजाबचे अनेक खेळाडू परतले आहेत. आतापर्यंत 200 हून अधिक कुस्तीपटू परतले आहेत. या लोकांनी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिल्याचे यामध्ये सहभागी असलेले दिल्लीचे पैलवान प्रदीप मीणा यांनी सांगितले.
कुस्तीपटूंचे आयओएला पत्र
कुस्तीपटूंनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला पत्र पाठवून आपल्या वेदना व भावना कळवल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे पदक हुकले होते, तेव्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी तिला प्रचंड मानसिक त्रास दिला होता. त्यानंतर विनेशने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावाही केला जात आहे.
बजरंग पुनियाचे पंतप्रधानांना आर्जव
ऑलिम्पियन कुस्तीपटू आणि 2022 राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बजरंग पुनिया याने शुक्रवारी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना आपल्या मागण्या ऐकण्याचे आवाहन केले. खेळाडूंना आपला सराव सोडून येथे आंदोलनात बसावे लागल्याचे आम्हाला दुःख आहे. आमचा लढा फक्त भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध आहे, असे पुनियाने म्हटले आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या आंदोलनात कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, रवी दहिया आणि दीपक पुनिया आदी सहभागी झाले आहेत.