16 सेलिब्रिटी असणार लॉक
कंट्रोवर्सी क्वीन कंगना रनौत लवकरच रियलिटी शो लॉकअपचे सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. हा शो 27 फेब्रुवारीपासून अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर ऍपवर स्ट्रीम केला जाणार आहे. या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या शोमध्ये अनेक चर्चित सेलिब्रिटींना एका लॉकअपमध्ये बंद केले जाणार आहे. शोच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये कंगनाने दीपिका पदूकोन आणि अन्य मुद्दय़ांवर वक्तव्य करत आताच चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे.
हा शो 72 दिवस चालणार असून यात एकूण 16 वादग्रस्त स्पर्धकांना एका लॉकअपमध्ये बंद केले जाणार आहे. या लॉकअपमध्ये सर्व स्पर्धकांना कुठलीच सुविधा पुरविण्यात येणार नाही. ओटीटी प्लॅटफॉमध्ये अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयरमध्ये याचे 24 तास स्ट्रीमिंग केले जाणार आहे. सर्व स्पर्धकांना टास्क जिंकून इम्युनिटी प्राप्त करावी लागणार आहे. शोची सूत्रसंचालिका कंगनाला काही विशेष शक्ती देण्यात आल्याचे समजते.
एका एपिसोडसाठी 1 कोटी
कंगना रनौतने छोटय़ा पडद्यावर येताच सर्वात महागडी सूत्रसंचालिका होण्याचा मान मिळविला आहे. अभिनेत्री प्रत्येक एपिसोडसाठी 1 कोटी रुपयांचे शुल्क घेत आहे. अभिनेत्री वीकेंडच्या एपिसोड्समध्ये दिसून येणार आहे. 72 दिवसांच्या शोमध्ये कंगना 22 एपिसोड्समध्ये दिसून येईल. एकता कपूर निर्मित शो लॉकअप वादांनी भरलेला ठरणार आहे. वादाशी संबंध असलेल्या कलाकारांनाच यात सामील केले जाणार आहे.