नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशनने (सीबीएसई) परीक्षा पार न पडलेल्या विषयांची परीक्षा आयोजित करणे तसेच उत्तरपत्रिका तपासण्याशी संबंधित योजनेची माहिती जाहीर केली आहे. लॉकडाउन संपल्यावर त्वरित सीबीएसईकडून उर्वरित विषयांच्या प्रश्नपत्रिकांची परीक्षा आयोजित करण्याच्या तारखांची घोषणा केली जाईल. लॉकडाउन मागे घेतल्यावर 4 दिवसांत उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे.
यंदाही सीबीएसईचा निकाल वेळेतच लागू शकतो. निकाल वेळेत जाहीर करण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे विधान भारद्वाज यांनी देशातील 100 सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी ऑनलाईन बैठकीदरम्यान केले आहे. यंदा नवे शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या मुद्दय़ावरही या बैठकीत चर्चा झाली आहे.
10वी आणि 12वीच्या प्रलंबित परिक्षांच्या आयोजनाची मोठी चिंता असल्याचे भारद्वाज म्हणाले. सीबीएसईने यापूर्वी केवळ उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक (29 विषय) विषयांसाठी प्रलंबित परिक्षेचे आयोजन करणार असल्याचे म्हटले हाते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अनुमोदन प्राप्त झाल्यावर प्रलंबित परिक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाणार असल्याचे भारद्वाज यांनी सांगितले आहे.
उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कार्ययोजना सीबीएसई आखत आहे. टाळेबंदी मागे घेतल्याच्या 4 दिवसांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू केले जाणार आहे. ही मूल्यांकन प्रक्रिया संबंधित शिक्षक घरातूनच करू शकणार आहे.
9वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम कमी करण्याची योजना तयार केली जात आहे. विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांच्या वाढत्या चिंतेदरम्यान सीबीएसईने अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.