कोरोना नियंत्रणासंबंधी मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊन संबंधी ठोस भूमिका घेतली असून संबंधित जिल्हय़ांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांना याबाबतचा अधिकार दिला आहे. त्यामुळे धारवाड, मंगळूर जिल्हा प्रशासनांनी बुधवारपासून लॉकडाऊन जारी करण्याची घोषणा केली आहे. तर बेंगळूर ग्रामीण आणि शहर जिल्हय़ांत यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मंगळवारी रात्री 8 पासून आठवडाभर लॉकडाऊन जारी राहणार आहेत.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे कोविड-19, पाऊस आणि कृषी कामांसंबंधी विविध जिल्हय़ांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. लॉकडाऊन जारी करण्यासंबंधी आपण कोणतीही सूचना देणार नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना नियंत्रणात येईल, असे आपल्याला वाटत नाही. त्यामुळे जिल्हय़ामधील परिस्थिती पाहून तुम्हीच निर्णय घ्या, असे येडियुराप्पा यांनी जिल्हा प्रशासनांना सांगितले.
बैठकीत लॉकडाऊनबाबत संमिश्र मते
बैठकीप्रसंगी बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, गुलबर्गा, म्हैसूर, मंगळूर, उडुपी, रायचूर, गदग, बेळगाव, बिदर, धारवाड जिल्हाधिकारी, पालकमंत्री, पोलीस प्रमुख , जि. पं. कार्यकारी अधिकाऱयांनी लॉकडाऊनबाबत मते मांडली. राज्यात लॉकडाऊन जारी करण्याबाबत संमिश्र मते व्यक्त झाली. काही जणांनी आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद करावी, असा सल्ला दिला. तर काहींनी संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे सांगितले. काहींनी शहरांपुरतेच लॉकडाऊन जारी करावे, असे मत मांडले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन लॉकडाऊनबाबत तुम्हीच निर्णय घ्या, अशी सूचना केली.
क्वारंटाईनबाबत अधिक जागृत रहा
कोरोना नियंत्रणासंबंधी जिल्हा प्रशासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत, रुग्णांचे प्रमाण, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली. कंटेन्मेंट झोनमध्ये खबरदारी घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱयांची कमतरता भासत असेल तर कंत्राटी तत्वावर 6 महिन्यांकरिता नेमणुका करा. स्थलांतर करून आलेल्यांच्या क्वारंटाईनबाबत अधिक जागृत रहा. कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक उत्सवांचे आचरण करण्यास परवानगी देऊ नका, अशा सूचनाही येडियुराप्पा यांनी बैठकीप्रसंगी दिल्या.
लोकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करा
बुथ पातळीवर बाधितांचा शोध घेण्यासाठी टास्कफोर्स समिती नेमून 60 वर्षावरील आणि गंभीर आजार असणाऱयांची कोरोना चाचणी करा, रुग्ण आढळलेले भाग सीलडाऊन करण्याची प्रक्रिया परिणामकारक झाली पाहिजे. धार्मिक स्थळे, बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना देखील त्यांनी जिल्हा प्रशासनांना केल्या.
रुग्णांसाठी 1955 खासगी इस्पितळांमध्ये व्यवस्था
राज्यात कोरोनाबाधितांवर उपचारसाठी खासगी इस्पितळांमध्येही व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील 1955 खासगी इस्पितळांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड राखून ठेवण्यात आले आहेत. सरकारी इस्पितळांमध्ये 27,718 बेड राखीव आहेत. सध्या 2774 बाधितांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.
बेंगळूरमध्ये बसेस बंद
बेंगळूर शहर आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ांमध्ये मंगळवारी रात्रीपासून आठवडाभर लॉकडाऊन जारी होत असल्याने या कालावधीत दोन्ही जिल्हय़ांमधून केएसआरटीसी आणि बीएमटीसीच्या बसेस बंद राहणार आहेत. मात्र, इतर जिल्हय़ांमधील बससेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरळीत राहणार आहे.