प्रतिनिधी / कुडचडे
राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सुद्धा लॉकडाऊन करण्यात येणार नाही म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते. पण बुधवारी दुपारी अचानक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवार संध्याकाळपासून चार दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित केल्यामुळे कुडचडे बाजारात सर्वत्र सामान घेण्यासाठी लोकांची धावपळ उडालेली दिसून आली. त्यात कुडचडेतील बागायतदार बाजारच्या बाहेर लोकांची रांग व बाजारात सर्वत्र गर्दी दिसून आली.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे पालन लोकांनी करावे यासाठी कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी आपल्या पोलीस ताफ्यासोबत कुडचडे बाजारात जागृती केली. बसस्थानक, जी-सुडा मार्केट, रेल्वे स्टेशन रोड, कुडचडेतील मुख्य बाजार येथे ध्वनिक्षेपक घेऊन माहिती देताना त्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घातलेल्या अटींचे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी बऱयाच जणांना मास्क परिधान न केल्यामुळे दंडही ठोठावण्यात आला.