प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी
जिल्हय़ातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्हय़ात सात दिवसांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने 8 जुलै 2020 रोजी पर्यंत जिल्हय़ात लॉकडाऊन जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात पुढील सेवा सुरू राहणार आहेत. 1. अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संबंधित कार्यालये, आस्थापना 100 टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीसह सुरू राहतील. 2. अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालये 10 टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. 3. पिण्याचा पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी व्यवस्थापन करणाऱया आस्थापना, सर्व बँका, पोस्टल सेवा, कुरियर सेवा, दूरध्वनी सेवा व इंटरनेट सेवा पुरवणाऱया आस्थापना, अत्यावश्यक सेवा देणाऱया आय. टी. आस्थापना, ऑनलाईन शिक्षण, ई-कॉमर्स सेवा, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध व दुधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरू राहतील. 4. मांस, मासे, अंडी यांची विक्री करणारी दुकाने बुधवार, शुक्रवार, रविवार व मंगळवारी सुरू राहतील. 5. रुग्णालये व सर्व वैद्यकीय आस्थापना, औषधालये, पशुवैद्यकीय दवाखाने, देखभाल केंद्र व पाळीव प्राण्यांच्या पशुवैद्यकीय आस्थापना व दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय व त्यांच्या आस्थापना, ऑईल, गॅस, पेट्रोलियम व ऊर्जा साधने पुरवणाऱया आस्थापना, त्यांची गोदामे व वाहतूक, प्रसार माध्यमे व इलेक्ट्रॉनिक मीडिया. 6. अंत्यविधी व अंत्ययात्रा यामध्ये 20 व्यक्ती उपस्थित राहू शकतील. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी उपाययोजना करुन त्यास परवानगी असेल. 7. शासकीय कामे व त्याच्याशी निगडित वाहतूक, शेतीविषयक कामे, कृषीमाल व कृषी उत्पादने या संबंधीची आयात, निर्यात, शीतगृहे, गोदाम सेवा व त्यासाठी आवश्यक वाहतूक, सर्व बंदरे व संबंधित सेवा. 8. मद्यविक्री ही फक्त ऑनलाईन सुरू राहील व घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. 9. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची पुनर्बांधणी, पंचनामे, मदत वाटप संबंधीच्या आस्थापना. 10. सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय, शेतीमाल प्रक्रिया करणारे युनिट, डाळ, तांदूळ गिरणी, पिठ गिरणी, खाद्याशी संबंधित उद्योग. 11. दुग्धशाळा, खाद्य व चारा युनिट यांच्या आस्थापना व वाहतूक, शासकीय, निमशासकीय वाहने, व कर्मचारी यांची कर्तव्यावर असताना वापरली जाणारी खासगी वाहने. 12. अत्यावश्यक सेवा व आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. 13. सायंकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत वैद्यकीय तपासणीचे कारण वगळता अन्य कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार नाही. 14. याशिवाय कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास संबंधित तहसीलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
ओळखपत्र आवश्यक
अत्यावश्यक सेवा, शासकीय, निमशासकीय प्रवास वाहतुकीसाठी संबंधितांनी त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच परवानी देण्यात आलेल्या सेवांसाठीच्या वाहतुकीसाठीही ओळखपत्र सोबत ठेवावे व वाहनावर स्वयंघोषित फलक लावावा. कंटनमेंट झोन अर्थात बाधित क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची सूट लागू असणार नाही.
स्वीटमार्ट राहतील बंद
बेकरीमध्ये पाव, बिस्किट यांची विक्री करता येईल. पण स्वीट मार्ट सुरू ठेवता येणार नाही आहेत. हॉटेलमधील पार्सल सेवेविषयी संबंधित हॉटेल मालकांनी त्यांच्या डिलिव्हरी बॉईजच्या नावे घालून संबंधित तहसीलदारांकडून अशा प्रकारची परवानगी घेतल्यास त्यांना पार्सल सेवा देता येईल अशा सूचनाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
गणपती शाळांसाठी परवानगी आवश्यक
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हय़ात मिठाईची फक्त घरपोच डिलिव्हरी देता येईल. सदर डिलिव्हरी बॉईज ठेवण्यासाठी संबंधित तहसीलदारांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे गणपती मूर्ती तयार करणारे कारखाने सुरू करण्यासाठी स्थानिक तहसीलदारांची परवानगी बंधनकारक आहे. मालवाहतूक करणाऱया वाहनांसमोर परवानगी पत्र लावणे बंधनकारक असून या मालवाहतुकीच्या वाहनामधून लोकांची वाहतूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
मालवाहतूक सुरू राहणार
2 ते 8 जुलैच्या लॉकडाऊनच्या काळात मालवाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत. पण, माल वाहतूक करणाऱया गाडय़ांवर दर्शनी भागात माल वाहतुकीविषयीचे स्टीकर लावण्यात यावेत. तसेच माल वाहतूक करणाऱया वाहनातून कोणत्याही इतर व्यक्तींची वाहतूक करण्यास किंवा माणसांची वाहतूक करण्यास बंदी असेल. अशा प्रकारे वाहतूक केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनमध्ये या गोष्टींना असेल बंदी
1. कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
2. जिल्हय़ाच्या सर्व सीमा बंद राहतील.
3. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची
वाहतूक (दुचाकी, तीन चाकी, चार चाकी
वाहने, रिक्षा, जीप, टॅक्सी, कार, बस) बंद राहील.
4. सर्व आठवडा बाजार बंद राहतील.
5. अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने व
आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद राहतील.
6. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना
एकत्र येण्यास मनाई राहील.
7. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी,
प्रवासावेळी मास्कचा वापर बंधनकारक.
8. अत्यावश्यक सेवेसाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे
आवश्यक असल्यास किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे.
9. दुकानावर एकावेळी पाचपेक्षा जास्त
ग्राहक उपस्थित राहणार नाहीत.
10. मोठय़ा प्रमाणावर जमाव जमेल, अशी कृती
करण्यास प्रतिबंध राहील.
11. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, पान, तंबाखू
यांच्या सेवनावर तसेच मद्यपानावर बंदी राहील.
12. कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर, हात धुण्याचा
साबण, सॅनिटायझर प्रवेशाच्या ठिकाणी आवश्यक.
13. कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वापर असणाऱया
जागा सतत निर्जंतुकीकरण कराव्यात.