अलारवाडजवळ गोदाम फोडून 27 लाखाचा माल पळविला
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात चोऱया, घरफोडय़ांचा आलेख पूर्णपणे कमी झाला होता. मात्र, चोरटय़ांनी एक गोदाम फोडून 27 लाखाचा माल लांबविल्याचे गुरुवारी उघडकीस आले आहे. यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फोर्ट रोडवरील मे. रामसिद्धेश्वर मार्केटिंग या कृषीसंबंधी साहित्य विक्री करणाऱया फर्मचे अलारवाडजवळ गोदाम आहे. हे गोदाम फोडून चोरटय़ांनी 27 लाख 71 हजार रुपये किमतीचा 1540 पीव्हीसी कॉलम पाईप, 27 सीआरआय मास्क पंप व 51 सीआरआय, आरएसएम केबल असे साहित्य पळविले आहे.
घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. यासंबंधी सुरेश सिद्धाप्पा खानाप्पगोळ, रा. घटप्रभा यांनी फिर्याद दिली आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.
21 मार्च रोजी सुरेश यांनी फोर्टवरील आपले दुकान उघडले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यांनी दुकान व अलारवाड येथील गोदामाला कुलूप लावून घटप्रभा गाठले. 9 एप्रिल रोजी बेळगावला येऊन दोन्ही ठिकाणी भेट दिली. त्यावेळी सर्व काही ठीक होते. गुरुवारी पुन्हा बेळगावला आले त्यावेळी गोदाम फोडल्याचे उघडकीस आले. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.