नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) लॉकडाऊनच्या कालावधीत राष्ट्रीय नोंदणीकृत चाचणी यादीतील 110 पैकी 25 ऍथलिट्सना नोटीस जारी केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आपल्या ठावठिकाणाची माहिती न दिल्याबद्दल या क्रीडापटूंकडून खुलासा मागवला गेला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत चाचणीसाठी नमुने घेतले जात नव्हते. पण, नाडाला मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे भाग होते आणि यामुळे ज्या ऍथलिटनी पुढील तीन महिन्यात आपण कुठे असू, याचा तपशील जाहीर केलेला नाही, त्यांना यासाठी नोटीस जारी केली गेली आहे. एखाद्या खेळाडूंना अशा 3 नोटीसा जारी केल्या गेल्या तर 4 वर्षांच्या निलंबनाला सामोरे जावे लागू शकते. देशभरात लॉकडाऊनची प्रक्रिया आता अनलॉक 1 च्या टप्प्यावर पोहोचली असताना नाडा यापुढे खेळाडूंचे नमुने घेऊ शकणार आहे.